BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२४

वाळू तस्करांकडून प्रांताधिकारी यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न !



शोध न्यूज : राज्यात सगळीकडेच वाळू तस्कर माजले असून, लोकसेवकावरील त्यांचे हल्ले वाढत असतानाच, आता तर थेट प्रांताधिकारी यांचाच गळा दाबून खून करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, त्यामुळे या वाळू तस्करांची मुजोरी किती वाढली आहे हेच दिसून आले आहे.


राज्यात सगळीकडेच वाळू चोरी बिनधास्तपणे होत असते आणि या वाळूचोरीला कुणाचा आश्रय असतो यचिहीइ माहिती आता सामान्य जनतेला झालेली असते. लोक खुलेआम याबाबत बोलत असतात, कारण त्यापेक्षा ते काही करू शकत नाहीत. महसूल विभाग, पोलीस यंत्रणा वाळू चोरीच्या प्रकरणी गुन्हे दाखल करातात, दंडही वसूल करतात. प्रसंगी काही टोळ्यांना हद्दपार करण्यापर्यंत कारवाई करीत असतात. कारवाईच्या बातम्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतात पण वाळू चोरी थांबल्याची कधीच दिसत नाही. वाळूचोरीच्या पैशातून गुन्हेगारी फोफावत चाललेली असते तशी वाळू चोरांची मग्रुरी देखील बेलगाम होताना दिसते. त्यातूनच वाळू चोरीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अनेक कर्मचारी, अधिकारी यांच्यावर हल्ले होताना दिसतात. रस्त्यावर वाळू चोरीचे वाहन रोखण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांच्या अंगावर गाडी घातली जाते. आता ही मुजोरी आणखी पुढे गेली असून, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. प्रांताधिकारी गायकवाड यांचा तर गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


एरंडोल परिसरात वाळू तस्करांचा मोठा बोलबाला आहे. एरंडोल तालुक्यातील उत्राण शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे, या तस्करांना राजकीय आश्रय आहे त्यामुळेच ते कुणाला जुमानत नाहीत असे या भागात बोलले जात आहे. प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि त्यांचे सहकारी वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी गिरणा नदीवर पोहोचले होते. ख्वाजा मिया दर्ग्याजवळ हे पथक पोहोचले असताना तेथे जवळपास दहा ते बारा ट्रॅक्टर्स त्यांना दिसले. वाळू चोरी होत असल्याचे दिसताच हे पथक आपल्या वाहनातून खाली उतरले. याचवेळी तेथे असलेल्या वाळू चोरांनी एकमेकांना सावध केले आणि पथक आल्याची सूचना एकमेकांना दिली. चार पाच जणांनी इतरांना हाक मारून जवळ बोलावून घेतले.


नदीवर वाळूचोरीसाठी असलेल्या या तस्करांनी थेट प्रांताधिकारी आणि अन्य सहकाऱ्यांवर हल्ला चढवला.प्रांताधिकारी गायकवाड यांना जमिनीवर पाडण्यात आले. त्यानंतर त्यांचा गळा दाबून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते अशी परिस्थिती तयार झाली होती. गुंड प्रवृत्तीचे वाळू चोर प्रांताधिकारी यांचा गळा दाबत असतानाच, त्यांच्या सहकाऱ्यांनी जोराने प्रतिकार केला त्यामुळे पुढील अनर्थ टळला गेला. पण या गुंडांनी पथकावर जोरदार दगडफेक केली. (Sand smugglers attempt to kill revenue officer)या दगडफेकीत आणि धराधारित प्रांताधिकारी गायकवाड आणि अन्य सहकारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून आकाश राजेंद्र पाटील, अमोल ( पूर्ण नाव माहित नाही ); राहूल ( पूर्ण नाव माहित नाही ); दादाभाऊ ( पूर्ण नाव माहित नाही ) आणि सागर या सर्वांच्या विरोधात  भारतीय दंड विधान  कलम-३०७, ३५३, ३३२, ३२३, ३७९, १४३, ५०४, ५०६ आणि महाराष्ट्र जमीन महसूल आ. नियम ४८ (७) (८) खाण आणि खनिज अधिनियम २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या परिसरात वाळूचोरी आणि माजलेल्या वाळू तस्करांच्या बाबतीत नेहमीच चर्चा सुरु असते पण  आता थेट प्रांताधिकारी दर्जाचे अधिकारी आणि त्यांचे पथक यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात मोठी चर्चा सुरु झाली आहे. या तस्करांना राजकीय आशीर्वाद असल्यामुळेच ते माजले आहेत. (Revenue officer)यामुळेच प्रांताधिकारी यांचा खून करण्याचा प्रयत्न  करण्यापर्यंत त्यांची  मजल गेली आहे. या घटनेनंतर तरी वाळू चोरांच्या मुसक्या कायमस्वरूपी आवळल्या जाणार काय ? असा सवाल उपस्थित होत असून, संताप देखील व्यक्त केला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !