शोध न्यूज : अवघ्या जगाला वेठीस धरलेला कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला असून, कोरोना रुग्ण आढळून येवू लागल्याने आणि रुग्णांची संख्या वाढीला लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. फारसी चिंता करण्याची परिस्थिती नसली तरी देखील याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
कोरोना महामारीने जगातील अनेक देश संकटात आले असून मजबूत असलेला आर्थिक कणा देखील मोडून पडलेला आहे. उद्योग धंदे मोडकळीस आले तर कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, प्रत्येकाच्या जवळची आणि कुटुंबातील माणसं या कोरोनाने डोळ्यादेखत हिरावून नेली आहेत. कशाशीही तुलना होऊ शकत नाही अशा या संकटाचा धसका मानव जमातीने घेतला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी अजूनही विस्कटलेली घडी सावरता आलेली नाही. या महामारीची आठवण देखील अस्वस्थ करून जाते. असे हे संकट गेले आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. देशात कोरोनाने पुन्हा आपले आस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली असून गेल्या चोवीस तासात १४८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर, देशातील विविध रुग्णालयात एकूण ८०८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. मागचा अनुभव विचारात घेता हिवाळ्याच्या दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असते. मागील वर्षी देखील हिवाळा सुरु होताच बाधितांची संख्या वाढलेली होती. हिवाळ्यात रुग्ण वाढत असल्याचा मागील तीन वर्षांचा अनुभव आरोग्य विभागाला आहे. यावेळी देखील डिसेंबर महिना सुरु होताच कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. तरीही चिंता करू नये असेच आरोग्य विभागाने म्हटले आहे. या वाढत्या संख्येवर आरोग्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे.
चीनमध्ये एका गूढ आजाराने तिथल्या आरोग्य विभागाची चिंता वाढवलेली असताना भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. चीनमधील एका गूढ विषाणूने तिथल्या आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत. तेथील आरोग्य विभाग सतर्क झालेला असून अनेक तरुणांना आणि किशोरवयीन मुलांना न्युमोनियाच्या नव्या व्हेरीएंटने ग्रासले आहे. (Corona patients increase again in India) वैज्ञानिक यावर संशोधन करीत आहेतच पण याचवेळी भारतात देखील कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत त्यामुळे भारतीय आरोग्य मंत्रालय अलर्ट झाले आहे. सद्यातरी याची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले जात आहे कारण, भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झाले आहे. परंतु दक्षता घेण्याचा आणि सदैव सावध राहण्याचे आवाहन मात्र केले जात आहे. काळजी करण्यापेक्षा दक्षता घेणे हे केंव्हाही महत्वाचे ठरते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !