शोध न्यूज : समान्य नागरिक चोरीच्या घटनांमुळे धास्तावलेला असताना आता या चोरट्यांनी देव देवतांनाही टार्गेट केले असून, पंढरपूर तालुक्यातील प्रसिद्ध मंदिरात देखील पाच लाखांची चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी केले असून भाविक मात्र या घटनेने अस्वस्थ झाले आहेत.
चोरी हा अलीकडे नित्याचाच प्रकार झाला आहे पण चोरांची मजल आता थेट देवीच्या मंदिरापर्यंत गेली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लम्मा देवीचे मंदिर प्रसिद्ध असून लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. कासेगांव येथे श्री यल्लम्मा देवीचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षी देवीची मोठी यात्रा भरते. पाच दिवसांच्या यात्रा काळात संपूर्ण राज्यभरातील तृतीयपंथी मंडळी एकत्र येतात. तसेच लाखो भाविकांची गर्दी होत असते.याच मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केली असून या चोरीमुळे भाविक अस्वस्थ झाले आहेत. मंदिरातील चांदीच्या मुखवट्यासह पादुका, केवड्याचे पान, सजावट केलेला प्रभावळ सुमारे पाऊणे पाच लाख रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सोन्याचा मुलामा दिलेला श्री यल्लम्मा देवीचा सुमारे ३०० ग्रॅम चांदीचा मुखवटा, दोन किलो चांदीच्या पादुका, ७०० ग्रॅमचांदीचे केवड्याचे पान आणि सुमारे साडेसहा किलो चांदीची सजावट केलेली प्रभावळ होती. यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
गुरुवारी मंदिर बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी चोरट्यांनी ही चोरी केली आहे. शुक्रवारी पहाटे पुजारी देवीच्या पूजेसाठी गेले. यावेळी त्यांना मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले तसेच देवीच्या मुखवट्यासह सर्व साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच गावकरी आणि भाविकांनी मंदिराच्या परिसरात गर्दी केली. देवातेचीही चोरी झाल्याने मोठ्या प्रमाणत संताप व्यक्त होताना यावेळी दिसून आला. चोरट्यांनी मंदिरात चोरी करण्याच्या आधी परिसरात असलेल्या घरांना बाहेरून कड्या लावल्या आणि त्यानंतर ही चोरी केली आहे. (Big theft in Kasegaon Yalamma temple) ही घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कार्यवाही सुरु केली. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, देखभाल दुरुस्ती न केल्याने ते गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे ही चोरी शोधणे पोलिसांपुढे आव्हान बनले आहे. यल्लम्मा देवीच्या यात्रेपूर्वी या चोरीचा छडा लागावा अशी मागणी गावकरी आणि भाविक करू लागले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !