शोध न्यूज : अवघ्या पंधरा मिनिटांच्या आत लाखो रुपयांचे २७ तोळे सोने घेवून चोरटे पसार झाल्याची मोठी घटना उघडकीस आली असून यामुळे अनेकांना धक्का बसला आहे .
सोलापूर जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ सुरु असून संधी मिळताच चोरी केली जात आहे. रस्त्यावर देखील काही बतावणी करून नागरिकांना लुटले जात आहे तर घरात कुणी नसल्याची नेमकी संधी साधत चोर आपला प्रताप दाखवत आहे. बंद घरे तर या चोरांच्या टार्गेटवर असतात आणि अशी घरे हेरून, बेमालूमपणे चोरी करून चोर पसार होत आहेत. वाढत्या चोऱ्यामुळे नागरिकांत असुरक्षिततेची भावना वाढीला लागली असतानाच, सोलापुरात एक धक्का देणारी चोरी घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. अवघ्या पंधरा मिनिटांच्या काळात चोरट्यांनी मोठे घबाड पळवले आहे. या चोरीमुळे नागरिक धास्तावले आहेत. काही मिनिटात २७ तोळे सोने चोरांनी लंपास केले आहे. सोलापूर येथील तुळजापूर वेस परिसरात ही घटना घडली आहे.
तुळजापूर वेस परिसरात अमित कलशेट्टी यांचे घर असून या घरी ही चोरीची घटना घडल्याचे समोर आले आहे. अमित कलशेट्टी यांच्या वाहिनी किराणा दुकानात गेल्या होत्या. घराशेजारीच हे दुकान आहे. याचवेळी वडील दुध आणण्यासाठी म्हणून बाहेर पडले. तर आई घराच्या पायऱ्या उतरून शेजाऱ्यांशी बोलत उभी होती. याच दरम्यान घरात कुणी नसल्याचे पाहून चोरटे घरात घुसले आणि कपाटातील तब्बल २७ तोळे सोने घेऊन पसारही झाले. दरम्यान सात वर्षांचा मुलगा पायरीजवळ खेळत होता. तो ओरडलाही होता पण त्याचा आवाज कुणाला ऐकू गेला नाही आणि चोरांनी शांतपणे आपले काम केले. मोठे घबाड घेवून ते काही मिनिटात पसार देखील झाले.
अमित कलशेट्टी यांच्या घराच्या खाली असलेले गाळे भाड्याने देण्यात आलेले आहेत. कलशेट्टी कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत आहे. या घरात जाण्यासाठी दहा पायऱ्या चढून जावे लागते. पंधरा मिनिटेच घरातील सदस्य जवळच गेलेले होते आणि तेवढ्या वेळात, घरात कुणी नसल्याही संधी साधत चोरट्यांनी २७.३ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या सोन्याची किंमत जवळपास १७ लाख रुपयांची आहे. चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे धाव घेण्यात आली पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. एवढ्या मोठ्या चोरीमुळे अमित कलशेट्टी यांचे कुटुंब हादरून गेले आहेच पण परिसरातील नागरिक देखील धास्तावले आहेत. सोलापूर येथील जोडभावी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आता या चोरीचा तपास करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. लहान मुलगा ओरडत असतानाही त्याच्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. आपल्या घरात कुणी नाही आणि कुणीतरी बाहेरचे लोक आपल्या घरात घुसत आहेत हे सात वर्षाच्या अविश या मुलाने पहिले होते. त्यासाठी तो ओरडत राहिला पण जवळच असलेली आजी, शेजाऱ्याशी बोलण्यात व्यस्त होती. (Theft of jewelery by breaking into a house) घरी आलेल्या चोरांबाबत हा मुलगा माहिती देत असून, एकाने चेहऱ्यावर मास्क लावलेला होता तर दुसऱ्याच्या डोक्यावर टोपी होती. या चोरांच्या हातात एक बॅग देखील असल्याचे हा मुलगा सांगत आहे. चोरांनी केवळ पंधरा मिनिटात ही चोरी कशी केली याबाबत अनेकांना आश्चर्य देखील वाटत आहे. तीन खोल्या पार करून, कपाटाचे कुलूप तोडून, आतल्या तिजोरीला बनावट चावी लावून सोने चोरण्याचा हा वेगळाच प्रकार असल्याचे या कुटुंबाला वाटू लागले आहे. आता पोलीस तपासात काय समोर येतेय याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !