शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसू लागले असून, सह संपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे समन्वयक दीपक गायकवाड यांनी देखील आपला राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.
शिवसेनेला धक्का देत एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांनी बंड केले, त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न करीत असतानाच, त्यांचे एकेक खंदे शिलेदार बाहेर पडू लागले आहेत. आता हे लोण सोलापूर जिल्ह्यापर्यंत आले असून, शिवसेनेचे मजबूत खांब आधार काढू लागले आहेत. यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट अत्यंत कमकुवत होऊ लागल्याचे दिसत आहे .
शिवसेनेने शरद कोळी यांना उपनेते पद बहाल केले आणि यामुळे जुने जाणते पदाधिकारी दुखावले गेले आहेत. जवळपास ४५ वर्षे शिवसेनेत काम केलेले आणि सद्या शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख असलेले, साईनाथ अभंगराव यांनी राजीनामा दिला आहे, शिवाय त्यांनी सद्याच्या शिवसेनेत चाललेल्या अनागोंदीवर प्रखर भाष्य केले आहे . त्या पाठोपाठ आता, शिवसेना समन्वयक दीपक गायकवाड यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. गायकवाड आणि अभंगराव यांच्या शिवसेना निष्ठेबाबत कुणालाही शंका नाही. पण या दोघांच्या बाहेर पडण्यामुळे, सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे.
शिवसेना समन्वयक दीपक गायकवाड यांनी देखील, शरद कोळी यांच्या निवडीकडे बोट दाखवले आहे. शिवसेनेला आता अनुभवी, जुन्या नेत्यांची गरज राहिली नाही, असं वाटतं. गबाळ्याच्या येड्या हाताखाली काम करायचं का, हेही समजेना. त्यामुळे जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड दिली. (Shock after shock in Shiv Sena in Solapur district) आपला राजीनामा थेट उद्धव ठाकरे यांच्याकडेच पाठविला आहे, असेही त्यांनी सांगितले. पक्षासाठी झिजून काम करत असताना, ४०-४० एकर जमिनी, गावातले प्लॉट विकले आणि पक्षाचे काम केलं. पक्षाला अजूनही सच्चा कार्यकत्यांची किंमत कळालेली नाही. १९९० पासून तालुक्यात विधानसभा प्रमुख १९९५ साली उमेदवार होतो. आठ-दहा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविल्या. हुशार माणसाची गरज पक्षाला आहे की नाही, अशा भावना व्यक्त करीत, एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडल्यावर आम्ही खूप दुःखी झालो, आम्हालाही धक्का बसला; परंतु जिल्ह्यात सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शिवसैनिकांना धीर देऊन आम्ही शिवसेना टिकवली, अशा परिस्थितीत पक्षाला अनुभवी माणसांची गरज नाही का, असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला.
सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला धक्क्यावर धक्के ! भिंती खचल्या, बुरुज ढासळले ! शरद कोळी यांच्या निवडीमुळे भूकंप .... साईनाथ अभंगराव यांच्या पाठोपाठ आणखी एक मोठा धक्का .... वेळीच नाही सावरले तर ---
एकीकडे शरद कोळी यांची निवड अनेकांना खटकली असून, सामान्य शिवसैनिकात देखील आश्चर्य व्यक्त होत आहे. शिव सैनिकांचा पाठींबा अभंगराव आणि दीपक गायकवाड यांना असल्याचे दिसत आहे. पंढरपूर विभागात देखील शिवसेनेला चेहरा उरलेला नाही. पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्याबाबत प्रचंड नाराजी दिसत आहे. केवळ दिखावा करून पक्षाचे काम चालत नाही, आपलाच विकास करण्यात गुंग असलेल्या पदाधिकाऱ्यामुळे पक्षाचा विकास होत नाही, अशा प्रतिक्रिया येत असतानाच, दोन महत्वाचे बुरुज ढासळले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !