नवरात्रीचा उत्सव सुरु झाला की दुर्गा पूजा सुरु होते, घराघरातील नवदुर्गा मनोभावे देवीची पूजा करतात, नऊ दिवसांचा उपवास करतात. नऊ दिवस रोज नवी माळ घटाला घातली जाते तशा या दुर्गाही रोज वेगवेगळ्या साड्या परिधान करतात. वेगवेगळी आभूषणे अंगावर सजवतात. चूल आणि मुल या संस्कृतीत अडकलेली भारतीय दुर्गा आता साता समुद्रापल्याड गेलेली आहे. ही दुर्गा रिक्षा, ट्रकही चालवते आणि विमानाचे देखील उड्डाण करते. काळानुरूप या दुर्गेने आपले रूप बदलले आहे, अबलेचा शिक्का देखील या नव दुर्गेने आता पुसून टाकला आहे. पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या या देशात आता, या दुर्गा विविध क्षेत्रात आपली कमाल दाखवत आहेत. सलाम या नवदुर्गांच्या पराक्रमाला ....
एकीकडे या दुर्गा आपण समाजात पाहतो पण दुसरीकडे एक दुर्गा तशीच उपेक्षित, दुर्लक्षित राहिली आहे. समाजाच्या विविध घटकातील दुर्गा आजही पुरुषाला लाजवेल असे कष्ट उपसत असते, पण या समाजाचे लक्ष या दुर्गेकडे जात नाही. विमान चालविणाऱ्या महिलेचे फोटो प्रसिद्धी माध्यमात झळकतात पण मर्दाचं काम करणाऱ्या अनेक दुर्गा समाजाच्या नजरेपासून कोसो मैल दूर राहतात. 'ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे' म्हणत कष्टाची पूजा करणारी ही दुर्गा, खऱ्या अर्थाने दुर्गेचे रूप आहे. हातात घण घेवून, तापलेल्या लोखंडावर घाव घालणारी ही दुर्गा वेगळीच नव्हे काय ? शिकलेल्या पोरीना उचलता येणार नाही एवढा वजनदार लोखंडी घण घेवून, लोखंडावर दणादण घाव घालणारी दुर्गा, घाव घालताना प्रत्येक घावासोबत खाली पडणारा तिच्या कपाळावरील घाम, तिच्या कर्तुत्वाचा वेगळा सुगंध तिच्या संसारात पसरत असतो.
लोखंडाचे चणे खाऊन, ती संसारात राबते आणि आपल्या पतीसाठी उदंड आयुष तसेच सुख मागते. या दुर्गेच्या भावना जगदीश खेबुडकर यांनी एका गीतातून बोलक्या केल्या आहेत. (Navadurga who wound on iron for family) ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लेऊ लेणं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं जीणं होऊ आबरुचं, धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी असू दे..........
आनंदाने परिश्रम करणाऱ्या या दुर्गेला सलाम !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !