BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० ऑक्टो, २०२३

तुरुंगातून पळाला आणि साधू बनून गावात आला !




शोध न्यूज : शौचास जातो म्हणून पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी, साधू बनून गावात आला आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची एक घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात समोर आली आहे. 


पत्नीचा खून केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेला, पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील शिवाजी नाथाजी भोसले याला १८ जून २०१६ रोजी पोलिसांनी अटक केली होती. तेंव्हापासून हा शिवाजी भोसले तुरुंगातच होता. त्याला पंढरपूर येथील उप कारागृहात ठेवण्यात आले होते.  त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि शिवाजीला उपचारासाठी बाहेर काढण्यात आले. उप जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर येथे त्याला उपचारासाठी पोलीस घेवून गेले होते. 


यावेळी बाथरूम आणि  शौचास जायचे असल्याचे सांगून तो बाथरूममध्ये गेला. आत गेल्यावर त्याने खिडकीच्या काचा काढून तेथून तो बाहेर आला. संरक्षक भिंतीवरून उडी मारून तो पोलिसांच्या तावडीतून निसटला. १२ जुलै २०२० रोजी तो पळाला तो पुन्हा पोलिसांच्या हाती लागलाच नाही. जवळपास साडे तीन वर्षे त्याने पोलिसांना गुंगारा दिला. 


पंढरपूर पोलिसांचे नशीबच ! पोलिसांना गुंगारा देवून पोलिसांच्या ताब्यातील आरोपी पळाला आणि चार वर्षांनी साधू बनून गावात आला .... पत्नीचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी  केली होती अटक पण, निसटला होता पोलिसांच्या ताब्यातून --- 


एवढा काळ गेल्यानंतर तो तिसंगी गावात आला पण साधूच्या वेशात ! साधू महाराज बनून गेल्यावर आपल्याला कुणी ओळखणार नाही असा त्याचा समज होता. पण गावातील लोकांनी त्याला पहिला आणि ओळखलाही.  काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. (Escaped from prison and came to the village as a monk) माहिती मिळताच पोलिसांनी आपला मोर्चा तिसंगीकडे वळवला. पोलिसांनी त्याला अलगद उचलला आणि पुन्हा गजाआड केला. हा शिवाजी हिंदी इंग्रजी आणि मराठी भाषाही बोलत होता आणि साधूचा वेश परिधान करून गावात आला होता. चार वर्षे बेपत्ता असलेला, पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून गेलेला आरोपी पुन्हा सापडल्याने पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !