BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ सप्टें, २०२३

पुण्याचा पाऊस थांबला, उजनीच विसर्ग घटला !



शोध न्यूज : उजनी धरणात पाणी येत असल्याने आनंदाचे वातावरण होते परंतु पुणे परिसरातील पाऊस जवळपास थांबला असल्यामुळे, उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात मोठी घट झाली आहे, उजनी धरण २२ टक्क्यावर गेले असून अजूनही पावसाची अपेक्षा आहे.


यावर्षी पावसाने दगा दिल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे, पावसाळ्याचे तीन महिने जवळपास कोरडेच गेले आहेत, शेवटच्या महिन्यात तरी मेघराजाची कृपा होण्याची अपेक्षा सर्वांनाच आहे. गेल्या काही दिवसात राज्यात विविध ठिकाणी चांगला पाऊस झाला असल्याने, धरणांची पाणीपातळी वाढली आहे. हवामान विभागाने देखील सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तीन जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचीही यावर्षी बिकट अवस्था आहे. त्यातच पुणे परिसरात चांगला पाऊस झाल्याने, उजनीच्या वरच्या बाजूला असलेल्या धरणात चांगला जलसंचय झालेला आहे. याचाच परिणाम म्हणून उजनी धरणात हळू हळू का होईना पण पाण्याची आवक होत आहे. उजनी धरणात पाणी येत असल्याने शेतकरी आणि नागरिक सुखावले होते पण, पुणे परिसरातील पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्यामुळे उजनीत येणाऱ्या विसर्गात मोठी घट होताना पाहायला मिळत आहे.


वरच्या धरणातून विसर्ग सोडण्यात येऊ लागल्यामुळे उजनी धरणात पाणी येत आहे पण आता या विसर्गात मोठी घट झाली आहे.  रविवारी संध्याकाळी हा विसर्ग १२ हजार २५५ होता परंतु तो आज मंगळवार सकाळी ६ वाजण्याच्या आकडेवारीनुसार ४ हजार ७७६ वर आला आहे. तरीही मागील ३६ तासात उजनी धरणात १ टीएमसी पाणी वाढले आहे. यामुळे उजनी धरणाची टक्केवारी दोन टक्क्यांनी वाढली असून आता ही टक्केवारी २२.६० वर पोहोचली आहे.  सोलापूर, पंढरपूर, संगोल्यासाठी पिण्यासाठी धरणातून पाणी तर सोडावेच लागणार आहे परंतु शेतीसाठी पाणी देण्यास धरणाने अजून हिरवा कंदील दाखवलेला नाही. शेतीसाठी पाणी अत्यावश्यक बनले आहे परंतु धरणात अपेक्षित जलसाठा अजून झालेला नाही. शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी उजनी धरणात ३३ टक्के पाणी असणे आवश्यक आहे, एवढे पाणी होण्यासाठी अजूनही ११ टक्क्यांची गरज आहे. सद्या उजनी धरणात ७५. ७६ टीएमसी पाणी साठा झालेला असून उपयुक्त जलसाठा मात्र १२.१० टीएमसी एवढाच आहे.


पुणे परिसरात चांगला पाऊस सुरु झाल्याने उजनीची परिस्थिती वधारत असताना पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे पुन्हा चिंता व्यक्त करण्यात येत असली तरी, सप्टेंबर महिन्यात आणखी पाऊस होणार असल्याचा खात्रीशीर अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, त्यामुळे अजूनही आशा आहे तथापि शेतकऱ्यांची पिके सद्या धोक्यात आहेत. त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर या पिकांना पाण्याची गरज आहे. उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या १९ धरणांपैकी १२ धरणे जवळपास १०० टक्क्यावर आहेत, त्यामुळे पुन्हा पाऊस सुरु होताच उजनीचा जलसाठा वेगाने वाढण्याची शक्यता आहे.


उजनी धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या धरणांची परिस्थिती बऱ्यापैकी झाली आहे. चासकमान, वडिवळे, आंध्रा, पवना, कासार साई, पानशेत ही धरणे १०० टक्के भरली आहेत तरवरसगाव ९९.५५ टक्के    भामा आसखेड ९५ टक्के, मुलाशी ९१ टक्के, टेमघर ८० टक्के, पिंपळ जोगे ७८ टक्के, माणिकडोह ६९ टक्के असा या धरणांचा जलसंचय आहे, (The discharge in Ujani Dam has reduced) उर्वरित धरणांची परिस्थिती अजून समाधानकारक झालेली नाही. गणेशोत्सवाच्या कालावधीत राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे आता पुन्हा या पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !