BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ मे, २०२३

पंढरपूर, मंगळवेढ्याला धक्का, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पाटील सर यांचे अपघाती निधन !

 




श्रद्धांजली !


शोध न्यूज : अत्यंत संयमी आणि मनमिळाऊ असलेले संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादीचे  मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रा. पी. बी. पाटील सर यांचे अखेर निधन झाले आहे.  कालपासूनच पंढरपूर, मंगळवेढा परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.


मुळचे  मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथील असलेले पी. बी. तथा प्रकाश भिवाजी पाटील यांची कर्मभूमी पंढरपूर ठरली. खाजगी शिकवणी घेण्यापासून ठेकेदारी आणि राजकीय वर्तुळात त्यांचा वावर राहिला होता. मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक होते. त्याचबरोबर मंगळवेढा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पद देखील ते सांभाळत होते. प्रवासाला कधीच ते थकत नव्हते आणि अशा प्रवासानेच त्यांचा घात झाला आहे, बुधवारी पुण्यावरून परत येताना पहाटेच्या सुमारास उरुळी कांचन येथे त्यांच्यावर अखेरचे मोठे संकट कोसळले. उरळी कांचन येथे ते रस्त्याकडेला चहा घेण्यासाठी थांबले असतांना, चहा पिऊन झाल्यानंतर ते रस्ता ओलांडून आपल्या गाडीकडे निघाले. याचवेळी एका खाजगी  ट्रॅव्हल्सने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर स्वरुपात जखमी झाले होते. 


जखमी झालेल्या पाटील सर यांना तातडीने उरळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जोराच्या धडकेमुळे त्यांना अधिक मार लागला होता, हा मार डोक्याला लागला असल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली होती, डोक्याला आणि छातीला जोरदार मार लागला होता. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर त्यांना वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होते, परंतु डॉक्टरांचे हे प्रयत्न देखील अपुरे पडले आणि उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यापूर्वीच कालपासून त्यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावरून पसरली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. कसलीही खातरजमा न करत सोशल मीडियावरून त्यांच्या श्रद्धांजलीच्या पोस्ट व्हायरल होत राहिल्या. प्रत्यक्षात रुग्णालयात उपचार सुरु होते आणि बाहेर मात्र त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत होती. 

 
त्यांच्या निधनाची बातमी पंढरपूर आणि मंगळवेढा येथे अत्यंत वेगाने पोहोचली तसा अनेकांना धक्का बसला. परंतु उशिरा पाटील सर यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील यांनी याबाबत खुलासा करून वस्तुस्थिती सांगितली. पाटील सर यांना दुनिया श्रद्धांजली अर्पण करीत असताना पाटील सर मात्र उपचार घेत होते. श्रद्धांजली अर्पण करण्याची अनेक्ना घाई झाली होती पण जिवंत व्यक्तीला श्रद्धांजली देताना त्यांच्या कुटुंबाला किती वेदना होतील याची कुणीच काळजी घेतली नव्हती. अखेर पाटील सर यांचे चिरंजीव प्रथमेश यांनी एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर टाकला आणि सरांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.  लोकांना एवढी घाई का होती ? श्रद्धांजली अर्पण करण्यापूर्वी किमान खात्री तरी करून घेणे गरजेचे असते पण, तसेही कुणी केले नाही. 

 
 विविध क्षेत्रात वावर असणारे पाटील सर हे तसे मितभाषी असले तरी सर्वांशी ते हसून खेळून बोलत असायचे. पंढरपूर येथील भजनदास चौक परिसरात अनेक वर्षे त्यांचा निवास होता. त्यानंतर लिंक रोड वर त्यांनी आपला बंगला उभारला. अनेक वर्षे ते ठेकेदारी करीत होते. या काळात त्यांनी अनेक मित्र जोडले. त्यांच्या स्वभावामुळे अनेकांशी त्यांची मैत्री झाली आणि त्यांनी ती अखेरपर्यंत जपली.


सोशल मीडियावरून त्यांचा निधनाची बातमी पसरू लागली तेंव्हा अनेकांचा यावर विश्वास बसला नाही. जो तो परस्परांना फोन करून या अघटीत बातमीची सत्यता तपासत राहिला. पाटील सर म्हणजे एक सामान्यांचा कळवळा असलेला माणूस होता. पंढरपूरच्या गोविंदपुरा भागात काळे गुरुजी यांच्या वाड्यात त्यांची शिकवणी वर्ग सुरु असायचे. त्यांच्या शिकवणी वर्गात आलेल्या गरीब विद्यार्थ्याकडून ते कधीही फी घ्यायचे नाहीत. विद्यार्थ्यांना प्रेम देत त्यांना मोफत शिकवायचे. हल्ली गल्लाभरू शिकवणी वर्ग सुरु आहेत पण पाटील सरांनी विद्यार्थ्याकडे कधी पैसा म्हणून पहिले नव्हते.  पाटील सर यांनी पंढरपूर विधानसभेची निवडणूकही जनता दलाच्या तिकिटावर, चक्र चिन्ह घेवून लढवली होती (आणि त्यावेळी त्यांच्या प्रचारासाठी तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग पंढरपूर येथे आले होते. अंबाबाई मैदानात त्यांच्या प्रचारासाठी मोठी सभा झाली होती. त्यानंतर मात्र निवडणुकीपासून ते दूर राहिले मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काम ते करीत होते, सद्या देखील ते मंगळवेढा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते.   


स्व. पाटील सर यांचे पार्थिव सायंकाळी  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या मूळ गावी, मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथे नेण्यात येणार आहे. मारापूर येथे त्यांच्या पार्थिवावर सकाळी आठ वाजता  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


त्यांची प्रकृती सुरुवातीपासूनच क्रिटीकल होती, डॉक्टर प्रयत्न करीत होते, डोक्याला जोराचा मार लागल्याने परिस्थिती बिकट झालेली होती. व्हेंटीलेटरवर त्यांना ठेवण्यात आले होते. आज दुपारी जहांगीर हॉस्पिटलचे पथक येऊन त्यांची पाहणी करून गेले. त्यांनीही असमर्थता दाखवली आणि तेथेच सगळ्या आशा संपुष्टात आल्या. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनता, पाटील सर प्रेमी सतत चौकशी करीत राहिले परंतु नेमकी माहिती मिळत नसल्याने आजही संभ्रम कायम होता. आता रात्री ९ वाजता याबाबत पुष्टी झाली असून यवत येथे उत्तरीय चिकित्सा करून पार्थिव पुढे मारापूरच्या दिशेने निघणार आहे.   (Finally, Patil Sir died suddenly, the doctor's efforts failed) अखेर पाटील सर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि भर दिवसा काळ रात्र आली. उष:काल होता होता काळरात्र झाली .......  पाटील सर, तुम्हाला श्रद्धांजली !


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !