शोध न्यूज : दहावीच्या परीक्षेला घाबरुन सोळा वर्षांच्या विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.
दहावी बारावीची परीक्षा म्हणजे जीवनातील शेवटची संधी असल्याचा गैरसमज अनेक विद्यार्थ्यांचा असतोच शिवाय काहीही करून दहावी, बारावी परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेच पाहिजे असा बहुतेक सर्व पालकांचा अट्टाहास असतो. आपल्या पाल्यांचा बुध्यांक विचारात न घेता पाल्याने परीक्षेत भरघोस गुण मिळवावेत असा कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष दबाव पालकांचा असतो. प्रत्येक पालकांना आपला पाल्य हा डॉक्टर, इंजिनियरच बनावा अशी अपेक्षा असते. पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि जेमतेम असलेला बुध्यांक यात पाल्याला कसरत करावी लागते. दहावीची मुले प्रचंड दबावात असतात आणि या मानसिकतेत त्यांचा योग्य अभ्यासही होत नाही. दहावीची परीक्षा म्हणजे जीवनातील अंतिम संधी असल्याचा आभास आणि गैरसमज विद्यार्थी करून घेतात आणि शेवटी अप्रिय घटनेला सामोरे जाण्याची वेळ येते. अशीच घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाची शालांत परीक्षा सुरु झालेली असताना आणि राज्यभर कॉपीची प्रकरणे गाजत असताना दहावी परीक्षेचा तणाव घेऊन परीक्षेला घाबरून मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील सोळा वर्षीय विद्यार्थिनी काजल बाळू बनसोडे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काल रविवारी ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने मंगळवेढा तालुका हादरून गेला आहे. मयत काजल बनसोडे या विद्यार्थिनीचे मामा विलास लक्ष्मण कांबळे यांनी या घटनेबाबतची माहिती मंगळवेढा पोलिसांना दिली आहे . विलास कांबळे यांच्या बहीण जयश्री बाळू बनसोडे या मरवडे येथे राहत असून त्यांचे पती बाळू बनसोडे यांचे गेल्या सहा वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्यासोबत मुलगा विशाल व मुलगी काजल राहत होते.
मयत काजल बनसोडे ही सोळा वर्षे वयाची विद्यार्थिनी दहाव्या इयत्तेत शिक्षण घेत होती. नुकतेच म्हणजे २ मार्च पासून दहावीची परीक्षा सुरु झालेली असून काजल हिला दहावी परीक्षेचे पेपर अवघड जात होते. परीक्षेचे पेपर अवघड जात असल्याबाबत तिने आपल्या आईजवळ बोलून दाखवले होते. तशाच तणावात काजलने तीन पेपर दिले आहेत तर उर्वरित सहा पेपर अजून शिल्लक आहेत. या पेपरची देखील तिला चिंता लागली होती आणि पेपर अवघड जात असल्याने ती मानसिक तणावात अडकली होती. काल रविवारी आई जयश्री आणि तिचा भाऊ विशाल हे कामावर गेले होते. कामावरून ते परत घरी आले तेंव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि पायाखालची जमीन सरकली. घरातच काजल हिने घराच्या पत्र्याच्या छताला असलेल्या अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याचे चित्र आई आणि भावाला दिसले.
सदर भयावह प्रकाराने घाबरून गेलेल्या आईने आणि भावाने तिचा गळफास कडून तिला तातडीने रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला परंतु काजलचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. सदर घटनेची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मरवडे परिसर आणि मंगळवेढा तालुक्यात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. (Student commits suicide due to fear of class 10 exam) मुले अशी टोकाचे पाऊल उचलत असल्याने आधीच पालक चिंतेत असतात त्यात या घटनेने आणखी चिंता वाढवली असून पालकांनी वेळेतच आपल्या पाल्यांना समजाऊन घेवून त्यांना विश्वास देण्याची गरज या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !