BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ मार्च, २०२३

सोलापूर जिल्ह्यात तीन दिवस पावसाची शक्यता !

 


शोध न्यूज : उन्हाळ्याची तीव्रता सुरु झाली असली तरी निसर्गाच्या लहरीपणाचे संकट घोघावू लागले असून सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे बळीराजा पुन्हा चिंतेत सापडला आहे. 


उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून चिंतेचे ढग जमा होताना दिसत आहेत. अवकाळी पाऊस दरवर्षीच बळीराजाचे मोठे नुकसान करून जात आहे. गतवर्षी पावसाळा संपला असे वाटत असताना झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले असून अजूनही शेतकरी त्यातून सावरला नाही. पुन्हा नव्या जोमाने पिके घेतली असताना आता उन्हाळ्याच्या तोंडावरच अवकाळी पाऊस आणि गारपीठ याचे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. राज्यातील काही भागात निसर्गाच्या या लहरीचा फटका बसला आहे आणि आणखी पावसाची शक्यता व्यक्त होत आहे . अंतिम टप्प्यात आलेल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसण्याची भीती निर्माण झालेली आहे शिवाय अन्य पिके देखील धोक्यात असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. आता पुन्हा तीन दिवस सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित हवामान अंदाजानुसार, १५ ते १८ मार्च २०२३ दरम्यान तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस व तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

 

या कालावधीत ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वारा आणि विजांच्या कडकडाटाचाही अनुभव घ्यावा लागणार आहे अशी माहिती मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राने दिली आहे. जोरदार वाऱ्यामुळे देखील पिकांना धोका उत्पन्न झाला असून द्राक्षांच्या घडाला मोठा धोका होऊ शकतो. केळींच्या बागांचेही नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकरी बांधवांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने परिपक्व अवस्थेतील रब्बी पिकांची काढणी व मळणी करावी. (possibility of rain for three days in Solapur district) काढणी केलेल्या शेत मालाची मळणी करणे शक्य नसल्यास पीक सुरक्षित  ठिकाणी साठवणूक करून ताडपत्रीचा साहाय्याने झाकून ठेवावे. पक्कभाजीपाला व फळपिकाची काढणी लवकर करून घ्यावी. असे आवाहन देखील करण्यात आले आहे.


राज्यातील काही भागात गारपिठीची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली असून पश्चिम विदर्भात गारपीठ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिमी हिमालयाजवळ पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाले आहे. तो हळू हळू पूर्व दिशेला सरकत आहे. यासोबतच हवेच्या खालच्या थरात चक्रकार वारे आहेत. त्यामुळे अमरावती विभागात गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमान वाढले असले तरी आगामी दोन दिवसात येथील तपमानात घट होणार आहे त्यामुळे राज्याच्या काही भागात या पावसाचा तडाखा बसण्याची चिन्हे असून बळीराजाने सावधगिरी बाळगणे आवश्यक बनले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !