BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ मार्च, २०२३

चिंता वाढली, सोलापुरात कोरोना रुग्ण वाढले, एक मृत्यू !

 


शोध न्यूज : कोरोनाने पुन्हा हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली असून सोलापूर शहरात एकदम आठ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे वेळीच दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


कोरोनाची महामारी परत गेल्याने दिलासा मिळाला असतानाच गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चिंतेत भर पडू लागली आहे. सोलापूर जिल्ह्याला कोरोनाने प्रचंड छळले आहे. राज्यात सोलापूर जिल्ह्याचा पहिल्या दहा जिल्ह्यात समावेश राहिला असून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात मोठा धुमाकूळ या कोरोनाने घातला होता. अर्थ आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झालेली असून सर्वात शेवटी सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. उशिरा का होईना पण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला होता आणि आता कुठे जनजीवन सामान्य झाले होते, पण पुन्हा सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण आढळू लागले आणि आता तर एकदम ८ रुग्णांची वाढ होऊन एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. (Corona patients increased in Solapur, one death) त्यामुळे काळजी करण्यापेक्षा योग्य वेळी काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 


सोलापूर शहरात एकाच दिवशी ८ रुग्ण आढळून आले असून एका ८० वर्षे वयाच्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सोलापूर महानगरपालिका अहवालात या मृत्यूची नोंद करण्यात आली असून शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता १५ वर गेली आहे. आज मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात याची नोंद असून सोमवारी १२६ जणांच्या कोरोना तपासणीत अँटीजेन तपासणीचे २८ तर आरटीपीसीआर तपासणीचे ९८ नागरिक होते. यातील ११८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. या आठ पॉझिटिव्ह रुग्णात पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेली महिला ८० वर्षांची असून हा रुग्ण रेल्वे लाईन परिसरातील रहिवासी आहे. त्यांना दमा आणि पक्षाघात असे आजार असल्यामुळे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण नंतर ११ मार्च रोजी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !