शोध न्यूज : पंढरपूर - पुळूज एस टी बसमधून उतरताना एका प्रवाशी महिलेचे दोन लाख रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस स्थानकावर प्रवाशांच्या चोऱ्या होणे हे काही नवीन नाही पण अलीकडे बसमध्ये बसलेले असतानाही हातचलाखी करून कधी चोरी केली जाते हे देखील समजत नाही. बसमध्ये चढताना अथवा उतरताना प्रवाशांच्या चोऱ्या हमखास होत असतात, विशेषत: महिलांच्या गळ्यातील दागिने बेमालूमपणे लंपास केले जातात. असाच काहीसा प्रकार पंढरपूर - कुरूल या एस टी बसने प्रवास करून उतरत असलेल्या महिलेच्या बाबतीत घडला असून तब्बल १ लाख ८९ हजार रुपयांचे दागिने सहजासहजी लंपास केले आहेत. याबाबत दोन महिलांवर संशय असून मोहोळ पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर - कुरूल या बसमधून टाकळी सिकंदर चौकात उतरताना ही घटना घडली आहे.
मोहोळ तालुक्यातील कुरूल येथील बाई हरिदास ननवरे या पंढरपूर येथील बहिणीच्या नातवाच्या लग्नासाठी गेल्या होत्या. जाताना त्या त्यांच्या भावकीतील दिलीप ननवरे यांच्या दुचाकीवर बसून गेल्या होत्या. परत गावी जाताना मात्र त्या आपल्या जाऊ पूजा ननवरे यांच्यासोबत पंढरपूर बस स्थानकावर आल्या आणि तेथून त्या पंढरपूर - पुळूज एस टी बस मध्ये बसून कुरूलकडे निघाल्या होत्या. बसमध्ये बसल्यावर पूजा ननवरे यांनी आपल्या गळ्यातील गंथण, नेकलेस, मंगळसूत्र असे दागिने आपल्या पर्समध्ये ठेवले होते. (Gold ornaments stolen from Pandharpur - Puluj ST bus) पंढरपूरहून त्या दोघी पुळूज एस टी तून गेल्या आणि मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे उतरताना दोन अज्ञात महिलांनी त्यांची हातचलाखी दाखवली. पूजा ननवरे यांनी आपल्या पर्समध्ये ठेवलेले दागिने बेमालूमपणे गायब करण्यात आले.
बसमधून टाकळी सिकंदर चौकात खाली उतरत असताना दोन महिलांनी धक्काबुक्की केली पण उतरण्याच्या घाईत हा प्रकार काही लक्षात आला नाही. त्यान्ह्च्या पुढे आणि मागे अशा दोन अपरिचित महिला होत्या आणि त्यांनी धक्काबुक्की करीत निघूनही गेल्या. दोघींनाही या महिलांचा संशय आला त्यामुळे त्यांनी आपल्या पर्सकडे पाहिले असता पर्सची चेन अर्धवट उघडी दिसली. बंद असलेली चेन कशी उघडली गेली म्हणून त्यांनी पर्स तपासून पहिली असता पर्समध्ये ठेवलेले दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोन्याचे मनी मंगळसूत्र, गंठण व नेकलेस असा एकूण एक लाख 89 हजाराचे सोन्याचे दागिने हातोहात चोरीला गेले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर मोहोळ पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !