BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ मार्च, २०२३

महाराष्ट्रात नव्या विषाणूचा फैलाव. सांगलीत पाच रुग्ण !



शोध न्यूज : राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच नव्या विषाणूचा फैलाव वेगाने होताना दिसत असून तीन मृत्यू झाल्या असतानाच सांगली जिल्ह्यात पाच रुग्ण आढळून आले आहेत. 


प्रचंड नुकसान करून गेलेला कोरोना पुन्हा परत येत असल्याचे आता स्पष्ट होत असून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंतही कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असतानाच नव्या H3N2 एन्फ़्लुएन्झा व्हायरसने धडकी भरवली आहे. राज्यात अहमदनगर, पुण्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून एकूण तीन मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे त्यातच H3N2 एन्फ़्लुएन्झाच्या रुग्णात आणखी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हायरस आता सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर आला असून सांगलीत पाच रुग्ण आढळल्याने प्रशासन एकदम सतर्क झाले आहे. यातील तीन रुग्ण सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील तर दोन ग्रामीण भागातील असून संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाने दिल्या आहेत. राज्यात  H3N2 एन्फ़्लुएन्झाचे रुग्ण आढळून येत असतानाच सांगली जिल्ह्यात एकदम पाच रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. 


सदर पाच रुग्णांत गंभीर स्वरूपाची लक्षणे नसून त्यांच्यावर सद्या घरीच उपचार सुरु करण्यात आले आहेत परंतु प्रशासन मात्र अलर्ट मोडवर आले आहे.   प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात ताप, सर्दी, खोकला असिः लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना देखील करण्यात आली आहे. राज्यभरात या व्हायरसचे रुग्ण आढळून येत असून पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथेही असे रुग्ण आढळले आहेत. नगर येथे  H3N2 एन्फ़्लुएन्झाच्या पहिल्या रुग्णाचा  मृत्यू झाला आणि त्यानंतर पुण्यात पिंपरी चिंचवड येथेही असा मृत्यू समोर आला आहे आणि आता सांगलीत एकदम पाच रुग्ण आढळून आले आहेत. 


  • औषध नाही !
  • देशभरात  H3N2 एन्फ़्लुएन्झा व्हायरस पसरत असून याच्यावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. अशी अत्यंत महत्वपूर्ण माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. 


राज्य शासन देखील आता सतर्क झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  H3N2 एन्फ़्लुएन्झा संसर्गाच्या संदर्भात आज एक महत्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत कोविड / H3N2 हे दोन्ही संसर्गजन्य असून दोघांचीही लक्षणही सारखी असल्याचं सांगण्यात आलं. कोविड काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा ही पुन्हा सक्रीय करण्याच्या सूचना या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. (Spread of new virus in Maharashtra. Five patients in Sangli) तसंच, गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क वापरण्याचे आवाहन करण्याबाबत सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान हा आजार जीवघेणा नाही अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. पंधरा वर्षे वयापेक्षा कमी आणि पन्नास वर्षे वयापेक्षा अधिक असलेल्या नागरिकांना  H3N2 एन्फ़्लुएन्झाची बाधा होत असल्याचे समोर आले असून ताप आणि खोकला अशी लक्षणे असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर व्हायरसचा ताप तीन दिवसांनी जातो तर खोकला मात्र तीन आठवडे राहू शकतो अशी माहितीही देण्यात आली आहे. लक्षणे जाणवत असल्यास मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी  न थुंकणे, शिंक आल्यास तोंडावर हात ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, नाक आणि डोळ्याला स्पर्श करणे टाळणे तसेच नियमित हात धुणे अशा प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !