शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून माढा तालुक्यातील एका तलाठ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
शासनाच्या विविध विभागात लाचखोरी बोकाळलेली असली तरी महसूल आणि पोलीस विभाग नेहमीच आघाडीवर दिसून येतात. शासकीय विभागात साहेबांपासून शिपायापर्यंत लाचखोरीचे लोण पोहोचले आहे हे आता काही नवीन राहिले नाही परंतु महसूल विभागाशी जनतेचा थेट संबंध येत असल्याने या विभागातील अनेक प्रकरणे समोर येत असतात. उप जिल्हाधिकारी पदापासून मंडलाधिकारी, तलाठी अशा पदावरील काही लोकसेवक लाचखोरीत अडकताना दिसतात. शेतकऱ्यांची विविध कामे तलाठ्याकडे असतात आणि साध्या कामासाठीसुद्धा तलाठी मोठी लाच मागताना दिसतात. अलीकडे शेतकरी देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करू लागले असल्याने अनेक लाचखोर बकरे सापळ्यात अडकतात. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आणखी एक लाचखोर तलाठी रंगेहात पकडण्यात आला असून यामुळे पुन्हा एकदा महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
शेत जमिनीची फोड करण्यासाठी म्हणून माढा तालुक्यातील दहिवली येथील तलाठी सहदेव शिवाजी काळे याने एका शेतकऱ्याला तब्बल ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. यातील १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना या तलाठ्याला त्याच्या घरातच जेरबंद करण्यात आला. दहिवली येथील कार्यालयात या शेतकऱ्याने आपल्या जमिनीची फोड करून सात बारा उतारा मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. या कामासाठी तलाठी काळे याने ३५ हजाराची मागणी केली आणि त्यातील दहा हजार रुपयांचा पहिला लाचेचा हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले. पस्तीस हजार रुपयांची मागणी केली होती परंतु तडजोड होऊन तीस हजार देण्याचे ठरले होते. त्यातील पहिला हप्ता घेतानाच त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला. लाच देतो असे सांगून सदर शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि सदर तलाठी काळे याच्याविरोधात लाचखोरीची तक्रार दिली.
तलाठी सहदेव शिवाजी काळे यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कुर्डुवाडी येथील त्याच्या निवासस्थानी जेरबंद केले आहे. माढा तालुक्यातील दहिवली येथील तक्रारदार यांचे तसेच नातेवाईक यांचे नावे दहिवली (ता.माढा) येथे सामाईक शेतजमीन असून, (Talathi in Madha taluka trapped in bribery case) सदर शेत जमिनीची फोड करून विभक्त करण्याकरता तक्रारदार यांनी सज्जा कार्यालय दहिवली येथे अर्ज केला होता. सदर अर्जानुसार शेत जमिनीची फोड करून विभक्त करण्याची कार्यवाही करण्यासाठी व त्याबाबतचा ७/१२ उतारा देण्याकरिता तक्रारदार याच्याकडे ही लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी करून सापळा लावण्यात आला. यावेळी तलाठी काळे याला त्याच्याच घरी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेने पुन्हा एकदा महसूल विभागाची लाचखोरी चर्चेत आली असून महसूल विभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !