शोध न्यूज : भर लग्नमंडपातून वरमाईच्याच जवळपास पाच लाख दागिन्यांची चोरी झाल्याची घटना पंढरपूर येथील एका मंगल कार्यालयात घडली असून चोरट्याने दागिन्याची बॅगच लंपास केली आहे.
जेथे संधी मिळेल तेथे चोरटे आपले 'काम' दाखवत असून सगळीकडेच असुरक्षितता अनुभवाला येत आहे. बंद घरांना चोरटे 'लक्ष' बनवत आहेतच शिवाय रस्त्यावर देखील लुटले जात आहे. बसस्थानकावर बसमध्ये चढ उतर करतांना महिलांच्या पर्स तसेच गळ्यातील दागिने देखील पळवले जात आहेत. लग्नातील गर्दीचा फायदा उठवून हातोहात दागिने पळवले जात आहेत. पंढरपूर येथील एका विवाह सोहळ्यात अशाच प्रकारे चोरी झाली असून नवरदेवाच्या आईची सोन्याची बॅग चोरटयांनी लंपास केली असून यात ४ लाख ८८ हजार रुपयांचे दागिने चोरण्यात आले असल्याचे आढळून आले आहे. पंढरपूर - कोर्टी रस्त्यावर असलेल्या श्रीयश पॅलेस मंगल कार्यालयात ही घटना घडली आहे.
श्रीयश पॅलेस येथे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील मुलगा विपुल शिराळकर आणि अकलूज येथील मुलगी सुरभी जोशी यांचा विवाह आयोजित करण्यात आला होता. दोन्ही बाजूचे वऱ्हाडी मंडळी विवाहासाठी जमले होते. विवाह सोहळ्याची धामधूम सुरु असतानाच नवरदेव मुलगा विपुल याची आई प्रीती किरण शिराळकर यांच्या दागिन्यांची बॅग गायब झाली असल्याचे लक्षात आले आणि एकच गोंधळ उडाला. श्रीमंत पूजनासाठी घातलेली दागिने त्यांनी काढून आपल्या पर्समध्ये ठेवले आणि लग्नासाठी म्हणून दुसरे दागिने घातले. थाटामाटात आणि उत्साहात विवाह सोहळा संपन्न देखील झाला पण नंतर मात्र चोरीची बाब उघडकीस आली. प्रीती शिराळकर यांना काही पैशाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी आपल्या पर्समधून पाचशे रुपये काढून घेतले आणि पर्स सोफ्यावर ठेवून शेजारीच त्या बसल्या. दरम्यान त्यांची पर्स चोरीला गेली. दागिने, रोख रक्कम, मोबाईल असलेली पर्स चोराने हातोहात लांबवली.
चोरीस गेलेल्या या पर्समध्ये ३१ हजाराची रोख रक्कम, ११३ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच पाच भार चांदी असा ऐवज होता. ६ तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, अडीच तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, ११ ग्रॅमची एक जोड सोन्याची कर्णफुले,५ ग्रॅमचे सोन्याचे कानातील वेल, १२ ग्रॅमचे सोन्याचे छोटे मंगळसूत्र, चांदीचा करंडा आणिरोख ३१ हजार रुपये असा एकूण ४ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. (A purse with gold jewelery stolen from a wedding ceremony) विवाह स्थळावरून ही मोठी चोरी झाल्याने लग्नस्थळी एकच खळबळ उडाली परंतु अज्ञात चोरटा पसार झाला. सदर प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !