शोध न्यूज : माघ वारीचा सोहळा आनंदी वातावरणात भाविक साजरा करीत असतानाच तब्बल १३७ भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याची मोठी घटना समोर आली असून यापूर्वीही अशा विषबाधेचा घटना घडल्या आहेत.
पंढरपूर वारीसाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक पंढरीत जमत असतात आणि भाविकांच्या सोईसुविधासाठी प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत असते. सर्व दृष्टीने काळजी घेवूनही काही अप्रिय घटना घडतात. त्यात अन्न आणि औषध प्रशासनाचे मात्र भांडे फुटत राहते. यात्रेसाठी गर्दी होत असल्याने अनेक तात्पुरती हॉटेल्स उभारली जातात, काही विक्रेते रस्त्यावर बसून काही पदार्थ विकतात पण त्यांची तपासणी होत नाही आणि कुठे ना कुठे भेसळीचे प्रकार सर्रास घडत असतात. त्यात उपवासासाठी वापरली जाणारी भगर ही कायम धोकादायक ठरू लागली आहे. यापूर्वी भगर खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार राज्यभर अनेकदा घडलेले आहेत आणि आता पुन्हा पंढरपूर माघ वारीत भगरीतून १३७ भाविकांना विषबाधा होण्याची घटना समोर आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा हा चिंतेचा विषय बनला आहे.
माघ वारीसाठी पंढरीत दाखल झालेल्या तब्बल १३७ भाविकांना विषबाधा झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांची प्रकृती ठीक असली तरी भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे. काल रात्री भाविकांनी संत निळोबा सेवा मंडळ मठात भगर आमटी खाल्लेली होती. त्यानंतर मध्यरात्रीच्या पुढे या भाविकांना उलट्या, मळमळ असा त्रास होऊ लागला. (Devotees in Pandharpur Magh Wari food poisoning) तब्बल १३७ भाविकांना विषबाधेचा त्रास झाला आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे परंतु भाविकांत चिंता निर्माण झाली आहे. यात्रा कालावधीत यापूर्वीही अन्नातून विषबाधा होण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने अधिक दक्ष होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !