शोध न्यूज : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात येणारा आणि राज्यात बंदी असलेला गुटखा, पिकअप वाहनासह २३ लाखांचा मुद्देमाल मंगळवेढा तालुक्यात पकडला असून याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात गुताख्याला बंदी असल्यामुळे कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात आणि सतत अवैधरीत्या गुटखा राज्यात येत असतो आणि अनेकदा मंगळवेढा, सांगोला अथवा पंढरपूर पोलिसांकडून तो पकडला जातो. अशा प्रकारच्या कारवाया सतत होत असल्या तरीही कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारा गुटखा कमी होत नाही. आता मंगळवेढा पोलिसांनी पुन्हा एकदा अवैधरीत्या वाहतूक केला जात असलेला गुटखा पकडला आहे. कर्नाटक राज्यातील चडचण येथून राज्यात बंदी असलेला गुटखा घेवून एक महिंद्रा बोलेरो पिकअप महाराष्ट्रात येत असल्याची गोपनीय माहिती मंगळवेढा पोलिसांना मिअल्ली होती त्यानुसार मंगळवेढा पोलिसांचे एक पथक या वाहनाची प्रतीक्षा करीत होते. हे पथक मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावाच्या परिसरात एका खाजगी वाहनाने पोहोचले आणि गोपनीयरित्या मिळालेल्या माहितीतील वाहनाची प्रतीक्षा करू लागले.
मरवडे गावच्या अलीकडील बाजूस सह्याद्री हॉटेलच्या समोर असलेल्या कच्च्या रस्त्यावर पोलिसांचे हे पथक पोहोचले तेंव्हा समोरून एक पिकअप वाहन येताना त्यांना दिसल. या वाहनाला पोलीस पथकाने थांबवले असता मिळालेल्या माहितीतीलच हे वाहन असल्याचे लक्षात आले. सदर वाहनाचा क्रमाक देखील एम एच ०८ डब्ल्यू ४३९९ असाच होता. या वाहनात असलेल्या दोघांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु नंतर गाडीत गुटखा असल्याचे त्यांनी कबूल केले. सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील संभाजी अमासिध्दराव बन्ने आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जालीहाळ बुद्रुक येथील बिकेन्नी गणपती न्हावी असे दोघे हे या वाहनात होते. सदरचा गुटखा हा चडचण येथून मल्लू चांदीकोटी याच्याकडून आणला असल्याची माहितीही त्यांनी दिली. सदर वाहन हे सांगोला तालुक्यातील एकतपूर येथील तानाजी माळी यांचा असून सांगोला तालुक्यातील मंगेवाडी येथील अमित विभूते याचा हा गुटखा असल्याचे सांगितले.
गुटखा असल्याची खात्री होताच पोलिसांनी सदर वाहन हे मंगळवेढा पोलीस ठाण्यात आणले. पंचासमक्ष वाहनातील मालाची तपासणी करण्यात आली त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे पथक मंगळवेढा येथे दाखल होताच सदर गुटखा आणि आरोपी त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पिकअप वाहनासह २३ लाख ४० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Mangalvedha police caught illegal Gutkha which was banned in Maharashtra) याप्रकरणी संभाजी अमसिध्दराव बन्ने, बिन्नी गणपती नाव्ही, अमित विभुते, पिकअप वाहन मालक तानाजी माळी आणि गुटखा पुरवठादार मल्लु चांदकोटी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २७२, २७३ व ३२८ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (i) व २६ (२) (ii), २६ (२)(iv), सहवाचन कलम २७ (३) (E), कलम ३० (२) (१) शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे हा गुन्हा दाखल केला गेला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !