BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ जाने, २०२३

भाजप - शिंदे गटाला आगामी निवडणुकीत मोठा धक्का बसणार असल्याचे सर्वेक्षण !

 



आज  निवडणूक झाली तर ....!

शोध न्यूज : निवडणूक एक वर्षावर आलेली असताना देशात आणि राज्यातील जनतेचा असलेला मूढ एका सर्व्हेतून समोर आला असून महाराष्ट्रात सद्या दिसत असलेल्या वातावरणानुसारच सर्व्हेचा कल आलेला आहे त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. 


देशपातळीवर सन २०१४ च्या निवडणुकीतील वातावरण राहिलेले नाही, भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात भ्रमनिरास झालेला आहे तरीही प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे आणि मतदारांना मजबूत पर्याय नसल्याने केंद्रात भाजप आघाडीचे सरकार येऊ शकते परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी दिसत आहे. गेल्या तीन वर्षात भाजपने केलेले राजकारण आणि शिंदे गटाचे बंड हे महाराष्ट्राला रुचलेले दिसत नाही. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द चांगली आणि इतरांपेक्षा वेगळी झाल्याने त्यांच्या समर्थकांची शक्ती वाढत निघाली असतानाच राज्यात सर्वात मोठे राजकारण झाले आणि ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खेचली गेली. फडणवीस - शिंदे सरकार सत्तेत आले आणि शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले पण सहानुभूतीची मोठी शक्ती उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभी राहिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला बळ मिळू लागल्याचे चित्र दिसत असतांना सी व्होटर चा सर्व्हे समोर आल्याने भाजप - शिंदे गटाच्या चिंतेत भर पडणार आहे.


निवडणुकीला अजून वर्षाचा अवकाश असला तरी सर्वच पक्षांनी, विशेषत: भाजपने निवडणुकीची तयारी जोराने सुरु केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या रणनीतीचा अवलंबही सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेला गैरवापर आणि त्यातून जनतेच्या मनात प्रतिबिंबित होत असलेले चित्र हे भाजपसाठी अडचणीचे ठरताना दिसत आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात २३ जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादीला चार, कॉंग्रेस पक्षाला एक आणि एमआयएमला एक जागा मिळाली होती.या निवडणुकीत शिवसेनेला १८ जागा मिळालेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात बऱ्याच काही राजकीय घडामोडी घडून गेल्या असून अजूनही या घडामोडी सुरूच आहेत. भाजप आणि शिंदे गट एकत्रित आल्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि आगामी निवडणुकीत काय चित्र दिसेल याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे पण त्याआधी इंडिया टुडेसाठी सी व्होटर या संस्थेने सर्वेक्षण केले आहे आणि यातून आलेली आकडेवारी ही भाजप- शिंदे गटाची चिंता वाढवणारी आहे. 


आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात ४८ पैकी ३४ जागा महाविकास आघाडीला मिळत असल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे. एकूण मतदानाच्या ४८ टक्के मतदान हे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाला मिळत असून या सर्व्हेनुसार भाजप शिंदे गटाला मोठा धक्का लागताना दिसून येत आहे. अर्थात महाराष्ट्रात भाजपला धक्का लागताना दिसत असला तरी या सर्वेक्षणानुसार देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता येताना दिसत आहे. सदर सर्व्हेनुसार भाजप आणि आघाडी यांना मिळून ५४३ पैकी २९८ जागा तर कॉंग्रेस आणि आघाडी यांना १५३ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. अन्य पक्षांना ९२ जागा मिळण्याची चिन्हे दिसत असून महाराष्ट्रात मात्र भाजप - शिंदे गटाची अवस्था कठीण होताना या सर्व्हेने दाखवले आहे. 


राज्यात झालेले सत्तांतर आणि फोडाफोडीचे राजकारण भाजपला फायद्याचे ठरणार नसल्याचे या सर्व्हेतून तरी समोर आले आहे. त्यात अजून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या निकालातून प्रलंबित आहे. हा निकाल जर शिंदे गटाच्या विरोधात गेला तर मात्र ही परिस्थिती अधिक बिकट होऊन महाविकास आघाडीला अधिक अनुकुलता मिळण्याची शक्यता आहे. (In the upcoming Lok Sabha elections, the BJP-Shinde group suffered a blow.) राज्यातील घडामोडी आणि फोडाफोडी याचा राज्यातील जनतेच्या मनावर काय परिणाम झाला आहे याचेच प्रतिबिंब या सर्व्हेतून उमटू लागले असल्याचे दिसत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !