शोध न्यूज : एकाच मंडपात एकाचवेळी दोन जुळ्या बहिणींशी केलेला विवाह बहुचर्चित ठरला असताना आता हा विवाह थेट देशाच्या संसदेत पोहोचला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील अतुल अवताडे याने रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणीशी लग्न केले. एकाच मंडपात एकाच वेळी दोन बहिणीशी लग्न केल्याची चर्चा राज्यभर होत आहे. वेळापूरजवळ एका मंगल कार्यालयात झालेल्या या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाले आणि असे लग्न करण्यामागचा हेतू देखील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचला. एकीकडे या लग्नाची चर्चा होत असतानाच दुसरीकडे कायद्याचा बडगा उगारणे सुरु झाले होते. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून न्यायालयाकडे चौकशीची परवानगी मागितली होती परंतु न्यायालयाने ती नाकारली आहे.
राज्य महिला आयोगाकडे देखील हे प्रकरण गेले होते आणि महिला आयोगाने पोलिसांना आदेश दिले होते परंतु न्यायालयानेच परवानगी नाकारली असल्याने पोलिसांची कारवाई ठप्प झाली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यात चौकशीचे अधिकार मिळावेत यासाठी न्यायालयात मागणी केली पण सीआरपीसीच्या कलम १९८ चा हवाला देऊन न्यायदंडाधिकाऱ्यांकडून अदखलपात्र खटल्याची चौकशी करण्याची परवानगीच नाकारण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रार करणारी व्यक्ती ही पिडीत पक्ष नाही, तक्रार करणारी व्यक्ती ही संबंधित कुटुंबातील सदस्य असावी. सदर खटल्यात तक्रार करणारी व्यक्ती ही पिडीत पक्ष नाही त्यामुळे सदर याचिकेची दखल घेवू शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार पोलिसांनी महिला आयोगाला देखील उत्तर दिले आहे.
न्यायालयाने नकार दिल्यानंतर हा विषय संपेल असे वाटत असतानाच या लग्नाचा विषय थेट देशाच्या संसदेत पोहोचला आहे. भारतीय संस्कृतीसाठी हे धक्कादायक असून अशा प्रकारचे विवाह रोखण्यासाठी कोणताही कायदा अथवा नियम अस्तित्वात नाही. अशा विवाहासाठी नियम कायदे तयार केले जावेत अशी मागणीच खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केली आहे. लोकसभेत शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. अशा विवाहाची सोलापूर जिल्ह्यातील घटना ही हिंदू संस्कृतीवर डाग लावणारी असून एकाच मंडपात दोन महिलांशी लग्न करण्याला रोखणारा कोणताच नियम अथवा कायदा नाही त्यामुळे तशा प्रकारचा कायदा करण्यात यावा. अशा प्रकारची पुनरावृत्ती रोखण्यासाठी नियम, कायदा तयार केला जावा अशी मागणीच खा . नवनीत राणा यांनी लोकसभेत केली आहे.
एकाच मंडपात सोलापूर जिल्ह्यात दोन जुळ्या बहिणींनी एकाचवेळी एकाच पुरुषाच्या गळ्यात वरमाला घातली आणि पहिल्यांदाच असा विवाह साजरा झाला. (The marriage of twin sisters reached the Parliament) या विवाहाची मोठी चर्चाही झाली आणि कायदेशीर पेच देखील निर्माण झाला. त्यानंतर या बहुचर्चित विवाहाचा मुद्दा थेट लोकसभेत उपस्थित झाला. एखादे लग्न लोकसभेत पोहोचण्याची देखील ही पहिली वेळ असावी. यामुळे हे लग्न आणखी काही काळ चर्चेत राहणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !