शोध न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांना पैसे वाटले पण निवडणुकीत पराभव होताच दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मिळून वाटलेल्या पैशाची वसुली सुरु केल्याच्या चर्चेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
कुठलीही निवडणूक म्हटलं की पैशाचा कसा पाऊस पडतो हे सामान्य मतदार उघड्या डोळ्यांनी पहात असतात. कुणी पैसे, दारू, साड्या वाटतो तर कुणी सुचेल तशी आमिषे दाखवत असतो. हा घाणेरडा प्रकार अलीकडे ग्रामपंचायत निवडणुकीत देखील दिसून येतो. सरपंचपदाची थेट जनतेतून निवडणूक सुरु झाल्याने तर चुरस वाढली आहे आणि चुरस वाढली की अन्य गैरप्रकाराला आपोआप जागा मिळू लागते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी अनेक धक्कादायक प्रकार समोर आले परंतु दौंड तालुक्यातील एका गावातील निवडणूक वेगळ्याच आणि तितक्याच धक्कादायक कारणांनी चर्चेत आली आहे. निवडणूक प्रचार झाला, निवडणुकीचा निकाल लागला आणि कोण उमेदवार कसा निवडून आला याची चर्चा गावोगाव सुरु झाली पण दौंड तालुक्यातील एका गावाची वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत येथील दोन उमेदवारांनी मतदारांना वाटलेल्या पैशाची मतदारांकडून वसुली सुरु केल्याची ही चर्चा जोरदार रंगू लागली आहे. विशेष म्हणजे एकमेकांच्या विरोधात लढलेल्या दोन उमेदवारांनी एकत्रित ही वसुली सुरु केल्याचे चर्चेत आहे. दोन तुल्यबळ उमेदवार निवडणुकीत उभे राहिले होते पण चौरंगी लढतीत हे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. एकमेकांच्या विरोधात लढून दोघेही पराभूत झाले आणि हा पराभव या दोन्ही उमेदवारांच्या भलताच जिव्हारी लागला. पराभूत झालेले दोन्ही उमेदवार एकत्र आले आणि त्यांनी आता वाटलेल्या पैशाची वसुली सुरु केली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. हे दोन धनदांडगे उमेदवार असून त्यांना पराभूत करून सामान्य कार्यकर्ता निवडणूक आला त्यामुळे या पडेल उमेदवारांचा तिळपापड झाला आहे. सदर दोन्ही उमेदवार मिळूनच रात्रीच्या वेळी मतदाराच्या घरात जात आहेत आणि वाटलेल्या पैशाची वेगळ्या प्रकारे वसुली करू लागले आहेत असे म्हटले जात आहे.
दोन्ही प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार मिळून मतदारांच्या घरात जाऊन विचारणा करीत आहेत. कुणाला मत दिले ते सांगा असा प्रश्न त्यांनी विचारला की मतदारांची पंचाईत होत आहे. एकटा उमेदवार गेला असता तर मतदारांनी 'तुम्हालाच मत दिले' असे सांगितले असते पण दोघेही एकत्र जात असल्यामुळे मतदाराची मोठी कोंडी होत आहे. कुणाचे तरी एकाचे नाव त्यांना घ्यावे लागू लागले आहे आणि एकाचे नाव घेतले की दुसरा उमेदवार वाटलेले पैसे परत मागू लागला आहे. दोघांच्याही कडून निवडणुकीसाठी पैसे घेतलेल्यांची तर भलतीच फजित होत असल्याची चर्चा आहे. दोघेही समोर असल्यामुळे कुणाला मत दिले आहे हे सांगावेच लागत आहे आणि एक जण लगेच पैशाची मागणी करीत असल्याचे सांगितले जात आहे. 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' असा प्रकार होऊ लागल्याने मतदारांपुढे मोठा पेच निर्माण झाला असून एकाला तरी घेतलेले पैसे परत द्यावे लागत आहेत. वसुलीला आलेले पडेल उमेदवार त्यांच्यासोबत तगडे कार्यकर्ते घेवूनच येत आहेत त्यामुळे तर गपगुमान घेतलेले पैसे परत देण्याची वेळ येत आहे अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
घाबरून कुणी पैसे परत देत आहेत तर कुणी 'पैसे खर्च झाले' असे सांगत आहेत. पैसे परत मिळत नाहीत हे दिसले की दमदाटी आणि मारहाण देखील करून पैशाची वसुली केली जाऊ लागली आहे. यामुळे गावात बराच गोंधळ सुरु झाला आणि कुणीतरी याची माहिती पोलिसांना दिली. यवत पोलीस लगेच दाखल झाले आणि त्यांनी गर्दी पांगवली. एकूण प्रकाराबाबत चौकशीही केली पण सगळाच चोरीचा मामला असल्याने कुणीच काही बोलत नव्हते. (Recovery of money distributed in Gram Panchayat elections) वस्तुस्थिती सांगितली तर पैसे घेणाऱ्या आणि देणाऱ्यावर देखील गुन्हे दाखल होऊ शकतात त्यामुळे कुणीच काही बोलले नाही आणि कुणाचीच काही तक्रार नसल्याने पोलिसांना देखील काही करता आले नाही. गावातील या प्रकारची आणि अजब वसुलीची मात्र जोरदार चर्चा रंगली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !