शोध न्यूज : नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच सोलापूर जिल्ह्यातील ढाब्यावर 'संक्रांत' आली असून एक चूक केल्यास ढाबाचालक आणि तळीराम गोत्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे त्यामुळे सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
चाललंय तरी काय ?
हॉटेल, ढाबा अशा ठिकाणी मद्यविक्री आणि मद्यप्राशन करणे कायद्याने गुन्हा असून गेल्या काही महिन्यांपासून अनेक ढाबाचालक तसेच मद्यपी यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केलेली आहे. अवैधरीत्या मद्य विक्री करताना आणि विनापरवाना ढाब्यावर मद्यप्राशन करणाऱ्या ग्राहकांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आणि लगेच न्यायालयात सुनावणी होऊन मोठ्या दंडाची शिक्षा करण्यात आली आहे. आता तर नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे आणि असे ढाबे तसेच ग्राहक यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक मंडळी रात्री उशिरापर्यंत ढाब्यावर जल्लोष करीत असतात. यावेळी ढाबाचालकाकडून विनापरवाना मद्य विक्री केली जाते तर धुंद होऊन नववर्षाचे स्वागत केले जात असते. या मंडळीना यंदा असा जल्लोष महागात पडणार असून सोलापूर जिल्ह्यात पंधरा पेक्षा अधिक पथके नियुक्त करण्यात आली आहेत. असा प्रकार कुठेही दिसला तर त्यांच्यावर थेट कारवाई होणार असल्यामुळे ढाब्यावर अशा प्रकारे नववर्षाचे स्वागत करता येणार नाही आणि सरत्या वर्षाला निरोपही देता येणार नाही. कुणी तसा प्रयत्न केला की थेट कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागणार असून नव्या वर्षाचा पहिला दिवस तुरुंगात काढावा लागणार आहे.
सरत्या वर्षाच्या अखेरील म्हणजे उद्या ३१ डिसेंबर रोजी बार व रेस्टॉरंट पहाटे एक ते पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, हॉटेल किंवा धाब्यांवर नवीन वर्षाची पार्टी करायची असल्यास २० हजाराचे शुल्क भरून त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 'वनडे क्लब' लायसन्स घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनापरवाना पार्टी केल्यास पार्टीतील सहभागी व्यक्तींसह हॉटेल मालकाविरूद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. हॉटेल मालकास २५ हजार तर मद्यपान करणाऱ्यांना दोन ते पाच हजारांचा दंड रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. गेल्या दोन तीन महिन्यात अशा प्रकारच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली असून अनेक मद्यपी मंडळीना हे महागात पडलेले आहे.
उद्यासाठी तर प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे त्यामुळे यावर्षी अनेक ढाबाचालक आणि तळीराम यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. ब्रिथ ॲनालायझर मशीन देण्यात आलेल्या असून मद्यपान करून वाहन चालविल्यास देखील मोठी कारवाई होणार आहे. (New Year's celebration in the hotel, police watch) ब्रिथ ॲनालायझर मशीन द्वारे पोलीस वाहन चालकांची तपासणी करणार आहेत. प्रशासन सर्वच दृष्टीने नजर ठेवून असणार आहे. गावागावात पोलीस पाटील यांच्यामार्फत देखील नजर ठेवली जाणार आहे त्यामुळे हा जल्लोष करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !