शोध न्यूज : आपल्या दुसऱ्या पत्नीला फसवण्यासाठी स्वतःच्या मुलीच्या आत्महत्येचा बनाव करत मुलीची हत्या केल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्याने नात्यालाच मोठा हादरा बसला आहे.
दुसऱ्याला अडचणीत आणण्यासाठी कुणाच्या डोक्यात काय कट शिजेल याचा नेम सांगता येत नाही. समाजात अशा कट कारस्थानाच्या अनेक घटना समोर येत असल्या तरी आपल्याच दुसऱ्या बायकोला अडचणीत आणण्यासाठी एका नराधम बापाने आपल्याच मुलीला गळफास देवून मारले. दुसऱ्या पत्नीला अडचणीत आणण्यासाठी त्याने हा पाशवी प्रयत्न केला पण पोलिसांच्या कौशल्याने सत्य बाहेर आले आणि नराधम बापाच्या हातात बेड्या पडल्या. हा सर्व प्रकार या बापाने क्राईम पेट्रोल सारख्या मालिकांना लाजवेल अशा पद्धतीने केले पण नागपूर पोलिसांनी बिंग फोडले. दुसरी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांना अडचणीत आणण्यासाठी पोटच्या मुलीची हत्या करण्याचे हे कारस्थान होते हे उघडकीस आले.
चाळीस वर्षे वयाच्या गुड्डू छोटेलाल रजक या नराधमाने आपल्या मुलीने आत्महत्या केली असल्याचा बनाव सुरुवातीला केला . त्याने याबाबत पोलीस ठाण्यात देखील तशा प्रकारचा गुन्हा नोंद केला होता. प्रत्यक्षात आपल्या सहा वर्षे वयाच्या मुलीला सोबत घेवून त्याने आपल्याच मोठ्या मुलीला फाशी दिले होते परंतु त्याने सगळ्यांच्याच डोळ्यात धूळ फेकली होती. नराधम गुड्डूची पत्नी आरती हिने विष प्राशन करून आत्महत्या केली होती त्यामुळे त्याने कौशल्या पिरपडे या महिलेसोबत दुसरे लग्न केले. या पत्नीला अडचणीत आणण्याचा डाव त्याने रचला होता. मयत मुलीने दहा पंधरा दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. रुग्णालयात तिचा जीव वाचला होता. यावेळी आपली सावत्र आई आपल्याला त्रास देत असल्यामुळे विष प्राशन केल्याचे या मुलीने सांगितले होते. सावत्र आईचा भाऊ देखील आपल्याशी अश्लील चाळे करतो त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे या मुलीने फोन करून मावशीला सांगितले होते.
याचाच गैरफायदा उठविण्याचे कारस्थान गुड्डूच्या डोक्यात शिजले. सावत्र आई आणि तिचे नातेवाईक मुलीना त्रास देतात त्यामुळे त्यांना त्रास देण्यासाठी या बापाने आपल्याच मुलीला गळफास देवून मारले आणि तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. आपल्याला सावत्र आई, मामा आणि मामी त्रास देत असल्याची एक चिट्ठी मुलीकडून आधी लिहून घेतली, मुलीला आत्महत्या केल्याचा देखावा करण्यास सांगितले आणि लहान मुलीला त्याचे फोटो काढण्यास सांगितले. घरातील लोक झोपी गेल्यावर बाप गुद्दुने या मुलीला स्टुलावर उभे केले. वर सिलिंगला दोरी बांधून तिच्या गळ्यात फास अडकवला. लहान मुलीकडून फोटो काढून घेतले. हे सर्व नाटक असल्याचे भासवत असतानाच त्याने स्टूलला लाथ मारली आणि एका क्षणात अवघ्या सोळा वर्षाच्या मुलीचा प्राण गेला.
ठरल्याप्रमाणे बापाने मुलीने आत्महत्या केल्याचे भासवले आणि पत्नी, तिचा भाऊ यांना अडकविण्याचे नियोजन केले. मुलीच्या हस्ताक्षरातील चिट्ठी होती त्यामुळे त्याचे नियोजन सहज खपण्यासारखे होते. पोलिसांच्या नजरेत मात्र काही संशयाने जागा केली आणि पोलिसांनी जरा वेगळ्या पद्धतीने तपास केला. गुड्डूच्या मोबाईलचे देखील विश्लेषण करण्यात आले आणि पोलिसांना याचा उलगडा झाला. इतरांना त्रास व्हावा म्हणून त्याने आपल्याच मुलीचा जीव घेतला पण पोलिसांनी त्याचे पितळ उघडे पडताच त्याला तुरुंगात जाऊन बसावे लागले. (Murdered the daughter to get the wife in trouble) माणसातील राक्षसाचा हा वेगळा नमुना समोर आला असून या घटनेने सगळेच तोंडात बोट घालू लागले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !