BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ नोव्हें, २०२२

बांधकाम मजुराच्या चार वर्षीय मुलाचे अपहरण !

 



शोध न्यूज : बांधकाम मजुराच्या अवघ्या चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना मंगळवेढा येथे घडली असून याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.


मंगळवेढा तालुक्यात विविध प्रकारची गुन्हेगारी सतत घडत असताना आता चार वर्षे वयाच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार पोलीसात दाखल झाली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील अनेक बांधकाम ठेकेदार आणि मजूर महाराष्ट्रात काम करीत असतात. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातही हे कामगार काम करून उपजीविका करीत असतात. छत्तीसगढमधील बांधकाम मजूर मनोजकुमार अमरसिंह साहू हा पंढरपूर बायपास रोड, एमआयडीसीच्या समोर वास्तव्यास असून तो बांधकामाचे काम करीत असतो. शिवाजी पार्क मंगळवेढा येथे जयदीप हेंबाडे यांचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामापासून ते साहू राहत असलेल्या ठिकाणापर्यंतच्या परिसरातून काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चार वर्षाचा रणवीरकुमार बेपत्ता झाला असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. 


बांधकामावरील कामाची सुट्टी झाल्यानंतर मनोजकुमार याने मुलगा रणवीर यास घरी घेवून जाण्यास आपल्या पत्नीला सांगितले होते. पत्नी मुलाला घेवून घरी गेली असेल असे मनोजकुमार याला वाटले परंतु तो घरी आला तेंव्हा मुलगा घरी आलेला नव्हता. पत्नीकडे चौकशी केली असता रणवीर वडिलासोबत घरी येतो असे म्हणाल्याचे पत्नीने सांगितले. त्यानंतर रणवीरचा शोध घेतला गेला पण तो कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे मनोजकुमार साहू याने आपल्या अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याची तक्रार मंगळवेढा पोलिसात दिली आहे. 
साहू याने दिलेल्या फिर्यादीनुसार  पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चार वर्षे दोन महिने असलेल्या रणवीरचे अशा प्रकारे अपहरण झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. 


तीन फुट उंच असलेला ४ वर्षे २ महिने वयाचा रणवीर रंगाने निमगोरा असून त्याने काळी हाप पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातलेला आहे. त्याच्या दोन्ही पायात काळ्या रंगाचा दोरा असून तो हिंदी भाषा बोलतो. अशा वर्णनाचा मुलगा आढळल्यास मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. (Construction worker's four-year-old son kidnapped) लहान मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असून चिंता देखील व्यक्त होत आहे.


    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !