शोध न्यूज : भर दुपारी भाविकांना घेऊन निघालेली एका खाजगी बसने एका युवकाला चिरडले असून सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणारा हा अपघात पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकत होता.
राजस्थान पासिंग असलेली ट्रॅव्हल्स आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मंगळवेढ्याकडून पंढरपूरच्या दिशेने येत असताना हॉटेल राजयोगच्या समोरच्या रस्त्यावरच हा अपघात झाला. चालत निघालेल्या ३४ वर्षे वयाच्या व्यक्तीला या खाजगी बसने चिरडले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील रेवणसिद्ध उर्फ दयानंद शिवाजी मोटे असे या अपघात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोटे यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून हे दृश्य डोळ्यांना न पहावणारे होते. रस्त्यावर रक्त सांडून रस्ता लाल झाला होता. बसच्या टायरखाली थेट डोके गेल्याने वाचण्याचा विषय शिल्लक उरला नव्हता. गजबजलेल्या परिसरात हा अपघात झाल्यामुळे अपघात होताच परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. शहर पोलीस चौकीच्या जवळच अपघाताची ही घटना घडली आहे.
मयत मोटे यांनी आपली गाडी रस्त्याच्या बाजूला लावली आणि तेथून चालत निघालेले असताना या खाजगी ट्रॅव्हल्स बस ने त्यांना उडवले. मंगळवेढा शहरात अवजड वाहनांना मनाई असतांनाही ही बस शहरातून वेगाने निघाली होती आणि त्यातून हा अपघात झाला. सदर रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते आणि अशा वर्दळीच्या रस्त्यावरून ही बस आली होती. (The youth was crushed to death by a private bus) सदर बस पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. सदर अपघाताची घटना घडताच मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात पाहून अंगावर काटा येत होता.
अपघात केलेली ट्रॅव्हल ही पॅकेज घेऊन जाणारी बस असून या बसच्या मागच्या चाकाखाली सापडून हा अपघात झाला असून या अपघतात चालकाची चूक नसावी असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते. पोलिसांनी सदर बस पोलीस ठाण्यात नेली असून पुढील कारवाई सुरु आहे. बसमध्ये असलेले भाविक देखील या घटनेने रखडले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !