शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात गाव तेथे दुध डेअरी सुरु करण्यास सुरुवात झाली असून यामुळे दूध संकलन वाढून शेतकऱ्यांचा अधिकाधिक फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्हा दूध संघावर अध्यक्ष म्हणून निवड झाल्यापासून दूध संघ प्रशासन सक्रीय झाल्याचे दिसत असून दुधातील भेसळ रोखण्यासाठी नुकतीच नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.तसेच भेसळीस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्याची कारवाई नुकतीच करण्यात आली आहे. संघाच्या दूध संकलनात वाढ होण्यासाठी संचालक मंडळ आणि विशेषत: अध्यक्ष शिंदे अधिक प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. दूध संकलनात वाढ व्हावी आणि शेतकरी बांधवांचा अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी आता नवी संकल्पना राबविण्याचे धोरण सोलापूर जिल्हा दुध संघाने घेतले असून याअंतर्गत 'गाव तेथे डेअरी' ही संकल्पना राबविण्यात येवू लागली आहे. यामुळे प्रत्येक गावात दूध डेअरी दिसणार असून दूध उत्पादाकाना आता गावातच आपले दूध संघाला घालणे सुकर होणार आहे.
'गाव तेथे डेअरी' ही संकल्पना राबविण्यात येत असून सद्या गावोगावी डेअरी सुरु करण्यास सुरुवात देखील झाली असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष शिंदे यांनी दिली आहे. अडचणीतल्या दूध संघाला सुस्थितीत आणण्यासाठी दुधाचे संकलन वाढण्याची आवश्यकता असून गावोगाव डेअरी सुरु करण्याची संकल्पना राबविण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. (Milk dairy in every village of Solapur district) सोलापूर जिल्ह्यातील एक हजार गावांपैकी शंभर ते दीडशे गावातूनच दूध जिल्हा दूध संघाकडे येत आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादकांनी आपले दूध संघाच्या डेअरीला पुरवावे त्यामुळे जो नफा जिल्हा दूध संघाला होणार आहे तो नफा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचा देखील फायदा होणार आहे असे शिंदे यांनी सांगितले आहे.
जिल्हा दूध संघाचे दूध संकलन वाढले असून आपण चेअरमन होण्यापूर्वी केवळ १७ हजार लिटर दूध संकलन होत होते, ते आता ४० हजार लिटरवर पोहोचले आहे. पूर्वी दूध उत्पादकांना वेळेवर पेमेंट मिळत नसल्यामुळे तशी परिस्थिती निर्माण झाली असेल म्हणून आम्ही वेळेवर दुधाचे पेमेंट करीत आहोत अशी माहितीही त्यांनी दिली आहे. दूध उत्पादक वेगवेगळ्या अडचणीत असतात आणि त्यांना बँकेकडून खेळते भांडवल देखील मिळत नाही. कर्जाचा पुरवठाही होत नाही त्यामुळे जिल्हा दूध संघ शासनाकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्हा दूध संघाच्या गाव तेथे डेअरी या संकल्पनेमुळे मात्र दूध उत्पादकांची गावातच सोय होणार असून यामुळे संघाचे दूध संकलन वाढण्यास मदत होणार आहे.
.webp)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !