BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ ऑक्टो, २०२२

तुळजाभवानीच्या आणखी दोन भाविकांचा अपघाती मृत्यू !



शोध न्यूज : आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला आणखी एक अपघात झाला असून या अपघातात वडील आणि मुलगी जागीच ठार झाले आहेत.

वरात्री सुरु होण्याच्या आदल्या दिवसापासून तुळजापूर मार्गावर सतत अपघात होत असून यात भाविकांचे मृत्यू होत आहेत आणि आज पुन्हा एकदा भीषण असा अपघात झाला आहे. तुळजापूर रस्त्यावर भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेलाच होता परंतु याकडे कुणीच गंभीरपणे पाहिले नाही आज पुन्हा मोठा अपघात पाहण्याची वेळ आली आहे. नवरात्री आणि दसरा ते पोर्णिमापर्यंत भाविक मोठ्या संख्येने तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेत असतात. यावेळी मात्र तुळजापूर रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरु असून आज पुन्हा भीषण अपघात झाला आणि तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. 


तुळजाभवानीचे दर्शन करून हैद्राबादच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या कारला वाघोली पाटीच्या जवळ मोठा अपघात झाला आहे. हैद्राबाद येथील एक कुटुंब ब्रिझा कारने देवदर्शन करीत फिरत होते. शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेवून हे भाविक कुटुंब तुळजापूर दर्शनासाठी पोहोचले. तुळजापूरला दर्शन घेवून ते परत हैदराबादकडे निघाले असताना औसा तालुक्यात वाघोली पाटी येथे त्यांच्या गाडीला अत्यंत भीषण असा अपघात झाला. लातूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकने या कारला उडवले आणि कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. 


या अपघातात दोघे जागीच ठार झाले असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या कारमधून पाच व्यक्ती चार बालकांना घेवून प्रवास करीत होते. या अपघातात तनविका सायकुमार डूबली, सायकुमार डूबली या वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. (Accidental death of Tuljapur devotees, father, daughter killed) सायकुमार डुबली यांच्या पत्नी देखील या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच किल्लारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली.


यावर्षी तुळजापूर दर्शनासाठी निघालेल्या आणि  तेथून परतणाऱ्या भाविकांना अपघाताचा मोठा सामना करावा लागला आहे. दर्शन घेवून परत जात असलेल्या भाविकांच्या कारला अपघात होऊन नुकतेच पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आडवे आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार एस. टी. वर जाऊन आदळल्याने पाच भाविकांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा कार अपघातात दोघांचा बळी गेला आहे.  तत्पूर्वी तुळजापूर - सोलापूर मार्गावर देखील अपघात होऊन सोलापूर येथील दोन तरुणांचा तर दुसऱ्या एका अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला होता. यावर्षी तुळजापूर दर्शनासाठी काही भाविकांना आपला जीव गमाविण्याची वेळ आली आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा महत्वाचा बनला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !