BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ ऑक्टो, २०२२

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत आढळला चक्क डमी शिक्षक !

 


शोध न्यूज : जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे आधीच कल्याण असताना या शाळेत चक्क एक डमी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा धककादायक प्रकार  सोलापूर जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आला आहे.  


जिल्हा परिषदेच्या शाळाबाबत पालकांचे मत प्रतिकूल असते आणि त्यामुळे जेथे अन्य पर्याय आहेत तेथे जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी आणि पालक पाठ फिरवताना दिसतात. या शाळांची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे मत पालकांचे असते. गावागावात या शाळा आहेत परंतु येथील शिक्षणाबाबत 'कल्याण' असते आणि नको त्या गोष्टीबाबत या शाळा चर्चेत असतात. शाळांच्या अशा परिस्थितीला शिक्षकच जबाबदार असल्याचे मानले जाते. अशातच सोलापूर जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामुळे पालकांत देखील मोठा हादरा बसला आहे. जिल्ह्यातील सगळ्याच शाळा बारकाईने तपासण्याची गरज निर्माण झाली असून जिल्हा परिषद शाळांवर पालकांनी विश्वास तरी कसा ठेवायचा असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. 


सोलापूर येथील हद्दवाढ भागातील सुशीलनगर येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार उघडकीस आला आहे. कुणी पालकांनी तक्रार करून हा प्रकार चव्हाट्यावर आलेला नाही तर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनीच साध्या वेषात जाऊन डमी शिक्षकाला रंगेहात पकडले आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी काल शनिवारी या शाळेला अचानक भेट दिली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे.  शिक्षणाधिकारी लोहार हे साध्या कपड्यात आणि विस्तार अधिकारी बापू जमादार यांच्यासोबत दुचाकीवरून या शाळेत गेले. शिक्षणाधिकारी शाळेत दाखल झाले असतानाही त्यांना कुणी ओळखले नाही उलट तेथील शिक्षकाने त्यांनाच 'कोण पाहिजे' असा सवाल केला. शिक्षणाधिकारी लोहार यांनी देखील आपल्या कडक शब्दात 'तुम्हीच पाहिजे' असे उत्तर दिले. 


शाळेत पोहोचल्यावर लोहार यांनी शाळेच्या वर्गांची पाहणी केली आणि काही मुलांशी संवाद साधला. त्यानंतर मात्र त्यांनी मुख्याध्यापक यांच्या खोलीत जाऊन शाळेतील शिक्षकांचा हजेरीपट पाहिला. यावेळी मात्र एक धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला आणि त्यांना अधिकच धक्का बसला. या शाळेतील एक शिक्षक वर्षभरापासून शाळेत येतच नाही हे तर दिसून आलेच पण त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षकाने आपल्या जागेवर एक डमी शिक्षक म्हणून एका महिलेला नेमले असल्याची बाब देखील समोर आली. लोहार यांनी थेट निलंबनाचा इशारा देत परिस्थिती जाणून घेतली असता 'संबंधित शिक्षक आजारपणामुळे शाळेत येऊ शकत नाही' अशी माहिती त्यांना देण्यात आली. 


वास्तविक असा कुठलाच प्रकार कुठल्याच शाळेला अथवा मुख्याध्यापकांना करता येत नाही परंतु 'शेतातील गडी आला नाही म्हणून त्याच्या जागी दुसरा गडी ठेवला' अशा प्रकाराने चक्क एका डमी शिक्षक महिला शाळेत विद्यार्थ्यांना धडे देत होती. बिहार, उत्तर प्रदेश अशा राज्यात असे प्रकार घडलेले आहेत पण महाराष्ट्राला हा प्रकार नवा आणि तितकाच धक्कादायक आहे. मुख्याध्यापकाला असा कुठलाच अधिकार नाही तरीही त्यांनी अशी गोष्ट केली आहे. विशेष म्हणजे एक वर्षांपासून हा प्रकार सुरु असून अधिकाऱ्यांना याबाबत काहीही माहिती मिळू दिली गेली नव्हती. शिक्षणाधिकारी लोहार यांनी हा प्रकार शोधून काढला आणि त्या बेपत्ता शिक्षकासह मुख्याध्यापकांना देखील याबाबत नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत लेखी खुलासा मागविण्यात आला असून आता त्यांच्यावर कारवाई होणे अटळ आहे. 


जेथे विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि भविष्य घडविण्याचे काम केले जाते त्याच ठिकाणी असा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडालीच आहे पण पालकवर्गाला देखील धक्का बसला आहे. (Dummy teacher found in Solapur Zilla Parishad school) या प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळांवरील उरल्या सुरल्या विश्वासाला देखील मोठा धक्का लागला असून जिल्ह्यातील सगळ्याच शाळा बारकाईने तपासण्याची वेळ आली आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !