BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ सप्टें, २०२२

केंद्रीय मंत्र्यांचे असे स्वागत, कदाचित पहिल्यांदाच !




शोध न्यूज :  महागाईची जाणीव करून देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्वागत करण्यात आले असून अशा प्रकारचे स्वागत कुणी पहिल्यांदाच केले असल्याचे सांगण्यात येत आहे.


कुणी मंत्री तालुक्याच्या दौऱ्यावर येत असेल तर त्या पक्षाचे कार्यकर्ते मंत्री महोदयाचे जोरदार स्वागत करतात. वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या जातात आणि मोठमोठे फलक लावून जोरदार स्वागत करण्यात येत असते. ही नेहमीची पद्धत आहे पण केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या इंदापूर दौऱ्याच्या निमित्ताने वेगळ्याच पद्धतीने स्वागत करण्यात आले असून या स्वागत फलकाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. महागाईने सर्वसामान्य माणूस पुरता कोलमडून पडलेला असताना महागाई वाढत चालली आहे. 'अच्छे दिन' येणार म्हणून वाट पहात असलेल्या गरीब माणसांचे 'पहिले दिन' सुद्धा निघून गेले आहेत त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात सतत टीका होत असते. 


इंधन दरवाढ, गॅसची महागाई, बाजारात गेले की प्रत्येक वस्तूंचे वाढलेले दर यामुळे सामान्य माणसांच्या चिंता वाढीलाच लागत आहेत परंतु भारतीय जनता पार्टीने 'बारामती मिशन' हाती घेतले आहे. बारामती मतदार संघात आता कुठल्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचे लक्ष बारामतीकडे लागलेले आहे. हे प्रत्यक्षात कितपत सत्यात उतरेल हा पुढचा भाग असला तरी भाजप नेत्यांनी मात्र आता बारामती मतदार संघाकडे लक्ष केंद्रित केले आहे. याच मिशनचा एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामती मतदार संघाचा दौरा जाहीर केला. 


केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपचे केंद्रीय मंत्री येणार म्हटल्यावर जोरदार स्वागत अपेक्षित आहेच. इंदापूर येथे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याने स्वागतासाठी मोठा फलक लावला आणि पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला. राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या नावाने लावण्यात आलेला हा फलक लोक आवर्जून वाचत थांबू लागले आणि त्याची चर्चाही करू लागले. असे स्वागत कधी कुणाचे झाले नसेल आणि कुणी कुणाचे केलेही नसेल. त्या स्वागत फलकावरील मजकूर देखील तशाच प्रकारचा होता. निमगाव केतकी येथील एक कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्री यांचा इंदापूर तालुक्यातील हा दौरा होता. 


या स्वागत फलकावर केंद्रीय अर्थमंत्री यांचा फोटो झळकत होता परंतु त्यावर लिहिलेला मजकूर मात्र वेगळाच दिसत होता. पेट्रोल डिझेल शंभरी पार केल्याबद्धल अभिनंदन!, स्वयंपाकाच्या गॅसने हजारी पार केल्याबद्धल अभिनंदन !,  जनसामान्यांच्या रोजी रोटीवर जीएसटी लावल्याबद्धल अभिनंदन !, रासायनिक खतांसह कृषी निधीष्ठानी उच्चांक गाठल्याबद्धल, पंधरा लाख रुपये भारतीयांच्या खात्यावर आल्याबद्धल, वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात येथे पोहोचविल्याबद्धल, महाराष्ट्रासह अन्य राज्यात लोकांशी पद्धतीने आलेले सरकार हद्दपार करून हुकूमशाहीची सत्ता आणल्याबद्धल, बारामती लोकसभा हे विकासाचे रोल मॉडेलला पहिली वेळ भेट दिल्याबद्दल अभिनंदन !  अशा प्रकारे हा मजकूर असल्याने हा फलक लक्षवेधी आणि चर्चेचा ठरला. अशा पद्धतीने केलेले स्वागत यापूर्वी कधी पाहण्यात आले नसेल. त्यामुळे याची चर्चा होत राहिली आहे. निमगाव केतकी येथे लावलेला हा फलक पोलीसानी काढल्याचे सांगितले जात आहे.  आता याला स्वागत म्हणायचं की ----- 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !