BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० सप्टें, २०२२

आयकर विभागाच्या धाडीत सापडली शंभर कोटीची अघोषित मालमत्ता !

शोध न्यूज : पंढरपूर, सोलापूर, उस्मानाबाद आदी ठिकाणी आयकर विभागाच्या पडलेल्या धाडीत शंभर कोटीपेक्षा अधिक रकमेची बेहिशोबी मालमत्ता सापडली असून ४३ कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे.


दोन आठवड्यापूर्वी पंढरपूर, सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक अशा ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. कृषी शिबिराचे फलक गाडीवर लावून हे आयकर अधिकारी भल्या सकाळीच या सर्व ठिकाणी पोहोचले होते. पंढरपूर येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि डीव्हीपी समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांच्या निवासस्थान, कार्यालय, साखर कारखाने अशा विविध ठिकाणी धाडी पडल्या होत्या तर सोलापुरात वैद्यकीय गटातील आश्विनी हॉस्पिटलचे डॉ. बिपीन पटेल आणि बांधकाम व्यवसायातील व्यावसायिकांवर या धाडी पडल्या होत्या. 


तीन दिवस चाललेल्या या धाडसत्रात काय सापडले हे आयकर विभागाने स्थानिक पातळीवर सांगितलेले नव्हते परंतु आज केंद्र शासनाच्या पीआयबी संकेतस्थळावर एक प्रेस नोट जारी करण्यात आली असून यात आयकर विभागाच्या धाडीबाबत माहिती देण्यात आली आहे. आयकर विभागाच्या या धाडीत शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली असून ४३ कोटींची रक्कम आयकर विभागाने जप्त केली आहे. शिवाय आयकर विभागाला डिजिटल स्वरुपात पुरावे देखील सापडले आहेत.  


वाळू उत्खनन, साखर उत्पादन, रस्ते बांधकाम, आरोग्यसेवा, वैद्यकीय महाविद्यालय चालवणे इत्यादी व्यवसायात असलेल्या दोन समूहांशी संबंधित ठिकाणी प्राप्तिकर विभागाने २५.८.२०२२ रोजी शोध मोहीम राबवून जप्तीची कारवाई केली. या शोध मोहिमेत महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या २० हून अधिक ठिकाणांचा समावेश आहे.


या शोधमोहिमे दरम्यान, कागदपत्रांच्या स्वरूपातील दस्तावेज आणि डिजिटल डेटाच्या रूपात मोठ्या प्रमाणात गुन्ह्याशी संबंधित पुरावे सापडले आणि ते पुरावे जप्त करण्यात आले. या पुराव्यांवरून या समूहाने अवलंबलेल्या बनावट खर्चाच्या नोंदी, अघोषित रोख विक्री, कोणतीही स्पष्टता नसलेल्या ऋण / कर्जाच्या नोंदी यासारख्या करचुकवेगिरीच्या विविध कार्यपद्धती उघड झाल्या आहेत. असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 


पुरावे सापडले ! 

वाळू उत्खनन आणि साखर उत्पादनात असलेल्या समूहाच्या बाबतीत, साखरेच्या 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी रोख विक्रीचे कागदोपत्री पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. या समूहाने आपले बेहिशेबी उत्पन्न आपल्या खातेवहीत बनावट असुरक्षित कर्जाच्या रूपात सादर केल्याचे या जप्तीच्या कारवाईत आढळले आहे. या समूहाने जमा केलेली 10 कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी रोकड अशा प्रकारे त्यांच्या खातेवहीत वळवण्यात आल्याची कबुली समूहाच्या अनेक कर्जदात्यांनी तसेच समूहाच्या प्रवर्तकांनी दिली आहे.


कोट्यावधीचे अघोषित उत्पन्न 

नॉन-फायलर कॉर्पोरेट कंपनीने मालमत्ता विकून सुमारे ४३ कोटी रुपये भांडवली नफा मिळवल्याचे पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. आरोग्यसेवा आणि वैद्यकीय महाविद्यालय चालवण्याच्या तसेच रस्ते बांधणीच्या व्यवसायात असलेल्या दुसऱ्या एका समूहामध्ये, कॅपिटेशन फी दर्शविणाऱ्या अघोषित रोकड पावत्यांचे आणि डॉक्टरांना दिलेले वेतन आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलेले विद्यावेतन यांचा परतावा यांचे पुरावे आढळले आहेत. या शिवाय, बनावट खर्चाची नोंद आणि कंत्राटी देय इत्यादीबाबत पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. या समूहाचे अशाप्रकारचे अघोषित उत्पन्न ३५ कोटी रुपये इतके असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


शंभर कोटी !

आतापर्यंत, शोध कारवाईमुळे शंभर कोटी रुपयांहून अधिकचे बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे. (Undeclared assets worth 100 crores found in income tax raids) याशिवाय पाच कोटींहून अधिकची अघोषित मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


काही सापडले नाही !

आयकर विभागाच्या धाडीत अवैध असे काहीच सापडले नाही असे सांगत डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी धाडीनंतर स्पष्ट केले आहे. हा सर्व प्रकार विरोधकांचे कारस्थान असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !