BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ सप्टें, २०२२

'सैराट' फेम सुरज पवार आता आणखीनच गोत्यात !

 




शोध न्यूज : 'सैराट' चित्रपटात नकारात्मक भूमिका केलेल्या सुरज पवार हा फसवणूक प्रकरणात आता अधिकच गोत्यात येऊ लागला असून फसवणूक झाल्याच्या आणखी सात तक्रारी पोलिसांकडे आल्या  आहेत. 


देशपातळीवर चर्चा झालेल्या 'सैराट' या चित्रपटात 'प्रिन्स' ची व्यक्तिरेखा साकारलेल्या सुरज पवार याचे एका मोठ्या फसवणूक प्रकरणात नाव पुढे आल्याने चर्चेचा विषय बनला आहे. मंत्रालयात नोकरी देण्याच्या नावाने फसवणूक केल्याचे एक प्रकरण उघडकीस आले आहे आणि अशा प्रकरणात सुरज पवार याचे नाव आले आहे. अहमदनगर जिल्हातील महेश वाघडेकर यांनी याबाबत पोलिसात धाव घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंत्रालयात कर्मचारी असल्याचा दावा केलेल्या काही लोकांनी नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचे हे प्रकरण असून यात सुरज पवार याचे नाव समोर आले आहे. 


अहमदनगर पोलिसांनी दत्तात्रय क्षीरसागर, विष्णू शिंदे, ओंकार तरटे आणि अन्य एकाला अटक केलेली आहे. महेश वाघडकर यांना नोकरी देतो म्हणून पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि पोलिसांच्या तपासात अशी रक्कम घेतली असल्याचेही समोर आले आहे. अहमदनगर येथील बस स्थानकावर वाघडकर यांच्याकडून दोन लाख रुपये रोख घेण्यात आले होते आणि उरलेले तीन लाख रुपये नोकरीवर रुजू झाल्यावर देण्याचे ठरले होते. नंतर मात्र वाघडकर यांना या आरोपींच्याबाबत शंका आली आणि त्यांनी पोलिसात तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि सगळे भांडे फुटले.   


या प्रकरणात सैराट मधील कलाकार सुरज पवार याचे देखील नाव समोर आले त्यामुळे आता त्यालाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. सुरज पवार याने 'पिस्तुल्या' या शॉर्ट फिल्ममध्ये नायक म्हणून काम केले होते आणि त्यानंतर तो 'फॅन्ड्री' चित्रपटातही दिसला होता. सैराट चित्रपटात त्याने प्रिन्स ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारली होती आणि आता खाजगी जीवनात देखील त्याची अशीच काहीशी भूमिका समोर आली आहे. 


फसवणुकीच्या प्रकरणात पोलीस तपासात सुरज पवार याचेही नाव समोर आले आणि या टोळीचा तो एक भाग असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. अटक केलेल्या आरोपींनी सुरज पवार याच्या सहभागाबद्धल पोलिसांना माहिती दिली आहे. ('Sairat' fame Suraj Pawar is in more troubleमहेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


एक तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी टोळीला गजाआड पाठवण्याचे काम सुरु केले असून सुरज पवार याची अटक अजून बाकी आहे. पोलीस त्याच्या अटकेसाठी गेल्याचे देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान आणखी सात तरुणांनी आपली अशीच फसवणूक झाली असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढू लागली आहे. पोलीस तपास सुरु असताना प्रिन्स तथा सुरज पवार हा संगमनेर येथे येवून गेल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत त्यामुळे पवार याचा पाय आणखीच खोलात चालला असून आता तो अधिकच गोत्यात येऊ लागला आहे.  


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !