BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ सप्टें, २०२२

दुधात पाणी, थेट पोलिसात गुन्हे दाखल करणार !

 



शोध न्यूज : दुधात पाणी मिसळण्याचा पर्यंत केल्यास थेट पोलिसात गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिला असल्याने अनेक 'मिसळ बहाद्दर' मंडळीचे धाबे दणाणले आहेत.


दूध आणि पाणी यांचे एक घट्ट आणि अतूट नाते आहे. वेगवेगळ्या पद्धतीने दुधात पाणी मिसळून 'पाणीदार' दुधाचे पैसे तयार केले जातात. डेअरीला घातल्या जाणाऱ्या दुधात भेसळ करताना काही मर्यादा तरी येतात पण घरगुती वितरण होत असलेल्या दुधात दूध शोधावे लागते एवढे पाणी असते. दूध नावाचे पांढरे पाणी महागड्या दराने विकलेही जाते आणि नाईलाजाने ते खरेदीही केले जाते. ग्राहकांनी तक्रार केली तर जादा दरांचे दूध घेण्याचा सल्ला दिला जातो. कमी दराच्या दुधात पाणी असल्याचे अप्रत्यक्षपणे हे विक्रेते कबूल देखील करीत असतात. त्यामुळे हे चक्क पाण्याचेही पैसे करीत असल्याचे उघडपणे दिसत असते. अन्न आणि औषध प्रशासन यांनी कधी तरी या 'पाणी'दार दुधाचा 'आस्वाद' घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

डेअरीला घातल्या जाणाऱ्या दुधात भेसळ करणे अवघड असले तरी तेथेही काही मार्ग काढून भेसळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते. हा प्रकार लक्षातही येतो तरीही पाणीदार दूध घालण्याचा प्रयत्न काही प्रमाणात का होईना केला जातो. असे दूध नाकारलेही जाते पण आता अशा भेसळखोरावर थेट पोलिसात गुन्हे दाखल करण्याचा इशारा (Solapur District Cooperative Milk Union) जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिला आहे. दूध संकलनात वाढ झाली पाहिजे परंतु संचालकांच्याच दुधात पाणी असते त्याचे काय करायचे? असा सवाल सभासदांकडूनच उपस्थित करण्यात आला आहे. यावर जिल्हा दूध संघाचे चेअरमन शिंदे यांनी हा इशारा दिला आहे. पोलिसात गुन्हे दाखल होऊ लागल्यास दुधातील पाणी निश्चितपणे कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. 


मिल्क मशीनवरच दूध स्वीकारले जाईल त्यामुळे माणसांचा हस्तक्षेप होणार नाही. दूध संकलनात गुणवत्तेशी कसलीही तडजोड केली जाणार नाही, संचालक असो अथवा अन्य कुणीही असो, गडबड करणाऱ्याच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येतील असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी सभासदांनी पाणीदार दुधाचा मुद्दा उपस्थित केला. दूध संकलनात वाढ होण्यासाठी सर्वांनी संघाकडे दूध घालावे असे आवाहन करण्यात आले तेंव्हा केगाव शीतकरणावर संचालकांचे पाणीदार दूध येत असल्याबाबत सभासदांनी सवाल केला. तेंव्हा, यापुढे अशा घटना घडणार नाहीत, थेट पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येतील (Adulteration of water in milk, cases will be filed)आणि संबंधित कर्मचारी यांच्या विरोधात बडतर्फीची कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !