शोध न्यूज : आटपाडीकडून पंढरपूरकडे येत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आज कराड रोडवर भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन प्रवासी ठार तर सहा जण जखमी झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अपघात अलीकडे राज्यात वाढताना दिसत असल्याने या बसचा प्रवास देखील आता असुरक्षित बनू लागला असतानाच आज पंढरपूर तालुक्यात हा मोठा आणि भीषण असा अपघात झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस आज आटपाडी येथून पंढरपूर कडे येत होती. ही बस पंढरपूर तालुक्यातील सोनके गावाजवळ पोहोचली असताना समोरून वेगात येत असलेल्या एका ट्रकने (एम एच ५०/ २१६६) सरळ एस टी ला जोराची धडक दिली. या अपघातात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील दोन प्रवासी ठार झाले तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. सदर अपघातात बस आणि ट्रकच्या समोरच्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघात होताच आजूबाजूचे नागरिक धावत गेले तर या मार्गावरून जाणारे अनेकजण घटनास्थळी थांबले होते.
अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण विभागाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि अपघाताची पाहणी केली. सदर प्रकरणी पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना पंढरपूर येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमी प्रवाशांची संख्या ही २० च्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !