BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ जुलै, २०२२

तसे आम्ही सज्जन !

 

- अशोक गोडगे 


 माणसं ही अशीच बघा! उगी कुणाचीही निंदानालस्ती करायची! निंदकाचे घर शेजारी असावे म्हणतात पण त्याला काही मर्यादा नको? उठसूठ निंदा! म्हणतात ना, 'दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही! उगी कुणाबद्दलही मागं काहीही बोलायचं! आपल्या भानगडी झाकून ठेवायच्या आणि दुसऱ्याच्या मात्र उघड्या करायच्या. बर मी म्हणतो, खरंच तसं काही असलं तर ठीक आहे हो, पण काहीही नसताना उगीच कुणालाही बदनाम करायचं? दुसऱ्यांची अकारण बदनामी करून यांना काय मिळतं ते तेच जाणे बुवा! आता आमचंच बघा ना, आमची एकसारखी. बदनामी चाललेली असते. आम्ही काय यांचं घोडं मारलंय कोण जाणे. पण सारखं आमच्याबद्दल हे लोक ओरडतच असतात. बरं मी म्हणतो, ओरडू द्या. पण निदान ओरडण्यासारखं आमच्या बाबतीत काही असलं तरी पाहिजे ना? नाहीतरी चर्चा करण्यासारखे आमच्याकडे असणार आहें तरी काय? तसे आम्ही सज्जन. आमची कशाला बदनामी करावी बरं...!


आता हेच पहा ना, लोक आम्हाला गुंड म्हणतात. सज्जनाला गुंड म्हणणं म्हणजे केवढा अन्याय! पण करतो आम्ही सहन. कारण तसे आम्ही सज्जन. गुंड म्हणोत नाहीतर मवाली म्हणोत. हां, तशी थोडीशी गुंडगिरी आम्ही केली म्हणा. नाही असं नाही, पण तेवढ्यावर का गुंड म्हणायचे. गुंडगिरी केली नसती तर ही एवढी जमीन आम्हाला मिळाली असती का? मी म्हणतो, नसेल आमचा अधिकार त्या जमिनीवर. पण एकट्या देशमुखाला एवढ्या जमिनीची काय बर आवश्यकता?  नाहीतरी त्याने ही जमीन काही फुकट दिली नाही. अहो हा देशमुख कधी आमच्याशी व्यवहाराने वागलाच नाही. दिलेला शब्द पाळायला नको का? पण त्याने आम्हाला धंद्यात चक्क फसवलं हो! अफू गांजा, चरस आम्ही बाहेर नेऊन विकायचे आणि हा फक्त गोदामाच्या चाव्या सांभाळायचा. भागिदारीत धंदा म्हटल्यावर मिळून काम करायला नको?  धंदा पडला दोन नंबरचा. जास्त काही गोंधळ करता येत नाही म्हणून आम्ही गप्प आणि त्यातच गाफील राहिलो. एकदा गोडाऊन मधला सगळा गांजा त्यानं विकून एकट्यानेच पैसे हडप केले हो! मग आम्ही भांडणारच की हो! पण लोक म्हणतात आम्ही गुंड. खरं तर तसे आम्ही सज्जन !


खरं तर असल्या अफू, गांजाच्या दोन नंबर धंद्यात आम्हाला पडायचे नव्हतं हो, पण पाटलामुळे हे सगळं करावे लागले. खरंच माणसं खूप बेईमान झालीत हो! हातोहात फसवतात. पत्ता लागू देत नाहीत. जग फार बदललंय बुवा! अहो, या पाटलासाठी आम्ही किती खून केले याचा हिशोब लावता येणार नाही. माणसांना जिवानीशी मारून टाकायचे म्हणजे काय थट्टा झाली? पण आमच्या कष्टाचं कुणालाच काही नाही. आमच्या जिवावर पाटील लक्षाधीश झाले, पण आम्हाला काय मिळालं? अनेक खुनात आणखी एका खूनाची भर! आम्ही आपलं पोटासाठी  असले धंदे करायचो. पाटील सांगायचे, 'अमक्याला मारा, तुम्हाला पैसे देतो. आम्ही आपलं माणसं मारत गेलो. यात आमचं काय चुकलं? आम्ही चुकणार नाहीच हो, कारण तसे आम्ही सज्जन !


गरजेलालागतील तसे पैसे पाटलाकडून घेऊ लागलो. बाकीचे त्यांचेकडेच ठेवत होतो. अहो, एवढी माणसं मारली, अर्ध गांव ओस पडलं. पाटलाला कुणी कशाला विरोध केला की आम्हाला सुपारी मिळायची. आम्हाला मोजता येणार नाही एवढा आमचा पैसा पाटलाकडं साठला.. एकदा पाटलाला सगळे पैसे मागितले तर पाटील म्हणाले, 'कसले पैसे? एक पैसा मिळायचा नाही. जास्त गडबड कराल तर तुम्हाला पोलिसांच्या हवाली करीन. तुम्ही केलेल्या सगळ्या खूनाचे माझ्याकडे पुरावे आहेत. गुमान रहा नाहीतर जाल खडी फोडायला'!. हा पाटील आमच्या जिवावर मोठा झाला आणि आता आम्हालाच पोलिसांच्या हवाली करायला निघालाय. आम्हीही विचार केला. आम्ही एवढे खून केले त्यात आणखी एकाची आणि शेवटची भर. आमच्या दृष्टीने तसे करणे महत्त्वाचे होते. मग काय, पाठवलं पाटलाला स्वर्गात. पाटील तसं वागलं नसतं तर आम्ही तरी कशाला बरं असं केलं असतं. तसे आम्ही सज्जन ! 

 

खरं तर माणसं मारण्याच्या धंद्यात पाटलानेच आम्हाला आणलं. आमचं आपलं चोऱ्या, दरोडे यावर मस्त भागत होतं. आता तुम्ही म्हणाल, चोऱ्या करणं काय ' चांगलं आहे? अहो आमच्या चोऱ्यामुळे  नुसतं आम्हीच जगत नाही तर पोलिसांचं पोटसुध्दा आमच्यावर अवलंबून आहे. आमच्यामुळं तर पोलिसांना काम मिळालं. वरचेवर जास्त पोलिसांची भरती व्हायला लागली पर्यायानेच बेकारी कमी व्हायला आमची मदत झाली. आम्ही तरी दरोडे कशाला घालतोय हो. पण पोटातली आग विझवण्यासाठी हे करावंच लागलं.. मुळचे तसे आम्ही सजजन! पण लोक चोर म्हणतात, म्हणू देत. आम्ही रात्री चोऱ्या करतो पण दिवसाढवळ्या तुमच्या संमतीने तुमच्या खिशावर धाड घालणारे भ्रष्ट अधिकारी हे तर केवढे मोठे चोर! सरकारी तिजोरीला लागलेल्या या तर घुशी आहेत घुशी! पण ते मात्र प्रतिष्ठित! आणि आम्ही तेवढे चोर....! व्वा रे व्वा न्याय ! काय अर्थ आहे राव?


खरं सांगू मित्रांनो, चोऱ्या तरी आम्ही का केल्या? मूळचे तसे आम्ही सजन! पण आम्हाला जुगार, मटका याचा भारी नाद. त्यामध्ये होतं, नव्हतं ते सगळ गेलं, घरंदारे विकून आम्ही नशीबामागं धावलो, पण मटक्याने आमचा मटका बसवला. जुगारीतही आमची वाट लावली. त्याला कारण म्हणजे आमचं दारू पिणं! अहो, चोवीस तास हातभट्टी झोकीत होतो. आता दारू पिणं म्हणजे गटारात पडणं वगेरे प्रकार आलेच की हो! ते काय सांगायला पाहिजे? तर या नशेत आम्हाला काही कळत नव्हतं. त्यात आमची फसवणूक झाली हो! म्हणून ही वेळ आली, नाहीतर आम्ही कशाला असले उद्योग करतोय? कारण तसे आम्ही सज्जन ....!

 

दारू पिणं बाईट आहे हे आम्हालाही कळतंय हो! पण सवय लागली त्याला काय करणार? बायको मेल्यापासूनन मला . दारुची सवय लागली बघा. 'अंदर' की बात तुम्हाला सांगतो. तुम्ही मात्र कुणालाही  सांगू नका हे! खरे तर माझी बायको  मेली नाही, मीच मारली तिला. अहो, मारणार नाही तर काय? एक तर हुंडा कमी दिला. मी गप्प बसलो. माहेरहून कलर टी.व्ही. आण म्हटलं तर ब्लॅक अँड व्हाईट आणला, मी गप्प बसलो ! बुलेट आण म्हटले तर राजदूत आणली. अरे जावयाला काही मान अपमान आहे की नाही? तरीही मी गप्प बसलो. एके दिवशी बायकोला म्हणालो, 'आपल्याला रहायला स्वतःच घर नाही. घर बांधायला तुझ्या बापाकडून पैसे आण'. पण ती नाहीच म्हणाली, देणारा देतोय, हिला नुसतं आणायला काय झालं होतं? समजावण्याचा प्रयत्न केला पण नाही ऐकलं. घेतला रॉकेलचा डबा आणि ओतला तिच्या अंगावर! म्हटलं जाग्यावरच मरून जाईल. पण लोकांनी विझवलंच. जाता जाता मात्र एक चांगलं काम करून गेली. पोलीस जबाब घ्यायला दवाखान्यात गेल्यावर तिने सांगितलं, 'स्टोव्हचा भडका उडून पेटले' जबाब दिला आणि मरून गेली. तिनं माहेरहून तेवढे पैसे आणले असते तर कशाला बरं आम्हाला तरी एवढं करावं लागलं असतं ? असो, आम्ही असं केलंच नसतं, कारण तसे आम्ही सज्जन! 

आम्ही सज्जन आहोत हे तुम्हाला माहीत आहे हो! पण लोकांनी उगीच आमच्याबद्दल गैरसमज निर्माण करून दिलाय. उगीचच आमच्यासारख्या सज्जनाची बदनामी करतात राव! पण आम्ही तरी काय करणार? तसे आम्ही सज्जन. बोलणाऱ्याच्या तोंडाला कसा हात लावणार? पण अशी बदनामी करून पापाचे वाटेकरी तेच होणार. परमेश्वरा, त्यांना क्षमा कर!  माणसं आमच्या सारख्यांचीही निंदा करताहेत. वास्तविक कुणी काहीही म्हणालं तरी आम्हाला त्याचं काय. काही झालं तरी तसे आम्ही सज्जन !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !