BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ जुलै, २०२२

शिवसेना खासदार संजय राऊत ईडी च्या ताब्यात !

 



मुंबई : सलग नऊ तास चौकशी केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना त्यांच्या 'मैत्री' बंगल्यावरून ताब्यात घेतले असून शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत.  तणावाची परिस्थिती निर्माण होऊ लागताच पोलिसांची मोठी कुमक पाचारण करण्यात आली. 


पत्राचाळ प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला आणि सकाळी सात वाजल्यापासून चौकशी सुरु केली होती. ईडी चे अधिकारी राऊत यांच्या निवासस्थानी आल्याची माहिती मिळताच राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले. मुंबईच्या भांडुप येथील 'मैत्री' या राऊत यांच्या निवासस्थानाच्या बाहेर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली आणि आक्रमक शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांमुळे वातावरण बदलून गेले. संजय राऊत याना आम्ही येथून नेऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी (Shivasena) घेतली. सकाळी सात वाजता राऊत यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आणि राऊत याना आज अटक केली जाणार असा कयास बांधण्यात आला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आज दुपारीच संजय राऊत याना अटक केली जाण्याची शक्यता बोलून दाखवली होती.  


केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असून विरोधकांनाच टार्गेट केले जात असल्याचा आरोप गेल्या दोन वर्षात सातत्याने होत आहे. संजय राऊत तर भाजप आणि भाजप नेत्यावर सतत प्रहार करीत होते. संजय राऊत यांच्या घरी हे पथक गेल्यापासून तर दिवसभर राज्य आणि देशातील विविध पक्षांच्या नेत्यांनी ईडीच्या गैरवापराबाबत संताप व्यक्त करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या विरोधात ईडी कडे पुरावे देत तक्रारी केल्या पण एकही नेत्यांची चौकशी करण्यात आली नाही असा आरोप आज पुन्हा होत आहे. 

 

संजय राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत यांची मे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी आहे.  पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणी शंभर कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचे समोर आले आणि सदर रक्कम प्रवीण राऊत यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग केल्याचे देखील आढळून आले होते. या प्रकरणाची चौकशी केली जात असताना ईडीने आपला तपास संजय राऊत यांच्याकडे वळवला आणि त्यांची चौकशी सुरु केली होती. (Shivsena MP Sanjay Raut in ED custody)मिळालेल्या समन्सनुसार संजय राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाने ईडी कार्यालयात बोलावून चौकशी केली होती. त्यानंतर राऊत याना पुन्हा समन्स आले होते परंतु राऊत यांनी वेळ वाढवून मागितली होती. आज मात्र ईडीचे पथक थेट संजय राऊत यांच्या घरी आले आणि सलग ९ तासांच्या चौकशीनंतर राऊत याना ताब्यात घेण्यात आले आहे.   


शिवसैनिक आक्रमक !

ईडी पथक राऊत यांच्या निवासस्थानी दाखल होताच शिवसैनिकांनी राऊत यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली. यात महिला शिवसैनिकांचा देखील समावेश आहे. भाजपकडून त्रास देण्याचा हा प्रकार असून भाजपात प्रवेश केला की ईडी कारवाया थांबतात आणि विरोधकांवर कारवाया होतात हा नवा अलिखित नियम देशात सुरु आहे परंतु भाजपच्या या कृतीला बळी पडणारे संजय राऊत हे नेते नाहीत. अशा प्रतिक्रिया शिवसेनेतून येत आहेत. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. 'ईडी च्या धमक्या देऊन शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले आहेत, शिवसेनेतून पळून गेलेल्या त्या ४० आमदारावर आधी कारवाई करा आणि मगच संजय राऊत याना येथून घेऊन जा' अशी भूमिका संतप्त शिवसैनिकांनी घेतली. संजय राऊत यांनी भगवा रुमाल दाखवत शिवसैनिकांना शांत केले. 


लढत राहू - राऊत !

"मरेन पण शरण जाणार नाही" असे खासदार संजय राऊत यांनी  ट्विट करून म्हटले आहे. शिवसेना आणि मराठी माणूस लढत राहील. खोटी कारवाई, खोटे पुरावे यामुळे झुकणार नाही तर लढत राहीन, अशा प्रकाराला घावरून शिवसेना सोडणार नाही  असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.  सकाळपासून संजय राऊत यांची चौकशी करीत होते पण चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे सांगून ईडीने त्यांना ताब्यात घेतले.  संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे भाऊ सुनील राऊत हे देखील आहेत. 

   

  • शिवसेना खा. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेले असून तेथे काही कायदेशीर प्रक्रिया करून झाल्यानंतर त्यांना कागदावर अटक दाखविली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


काहीही मिळाले नाही !

सलग ९ तास राउत यांच्या बंगल्यावर ईडी पथकाने सर्च केले परंतु त्यांना एकही कागद मिळाला नाही, आम्ही या लढाईला सामोरे जाऊ आणि विजयी होऊ, राऊत यांना घेवून जाताना शिवसैनिक थोडेसे बेभान झाले आणि प्रेमामुळे ते स्वाभाविक देखील आहे. आमचे कुटुंब थोडेसेही डगमगले नाही, शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत असून ही कारवाई केवळ राजकीय सुडापोटी आहे अशी प्रतिक्रिया सुनील राउत यांनी व्यक्त केली आहे.   




 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !