सोलापूर : आजारी पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने तो दुचाकीची चोरी करायचा आणि पत्नीच्या आजारपणाचा खर्च भागवायचा अशी एक घटना समोर आली असून त्याच्याकडून पोलिसांनी दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.
चोर वेगवेगळ्या कारणांसाठी चोऱ्या करतो, काही चोर मौजमजेसाठी चोरी करतात तर कुणी आपल्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी या गुन्हेगारी मार्गाकडे वळलेले दिसतात. सोलापूर येथील एक चोर मात्र आपल्या पत्नीच्या आजारपणाचा खर्च भागविण्यासाठी दुचाकीची चोरी करीत असल्याचे विदारक सत्य पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. ५२ वर्षे वयाचा शफी मौला शेख हा पेंटर म्हणून मिळेत तेथे काम करतो. पेंटर शफीला दोन मुले आहेत आणि पत्नीला अर्धांगवायू झाला आहे. पेंटिंग कामातून शफीला मिळणाऱ्या जेमतेम पैशात मुलाचा आणि पत्नीच्या आजारपणाचा खर्च भागत नव्हता. अर्धांगवायू झाल्यामुळे पत्नी अंथुरणावर खिळून आहे आणि तिच्या उपचाराचा खर्च कुठून करायचा हा मोठा प्रश्न पेंटर शफीपुढे होता. यातून त्याने दुचाकी चोरीचा मार्ग निवडला पण अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
शफी हा हॅण्डल लॉक नसलेल्या दुचाकी चोरायचा आणि चोरलेली दुचाकी कुणाकडे तरी गहाण ठेवून त्याच्याकडून पैसे मिळवायचा आणि हा पैसा तो आपल्या पत्नीच्या उपचारासाठी खर्च करायचा. अशाच प्रकारे चोरलेली एक दुचाकी घेऊन शफी हा कुमठा नका भागातील पारशी विहीरीच्या जवळ बस थांब्याच्या आसपास थांबला असल्याची माहिती एक खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा लावला आणि त्याला चोरीच्या दुचाकीसह पकडले. दुचाकी चोरीबाबत त्याच्याकडे चौकशी सुरु केली असता पोलिसांना बरीच माहिती मिळाली. सोलापूर शहरातील रूपाभवानी मंदिर, गणपती घाट, होम मैदान अशा विविध ठिकाणावरून त्याने दहा दुचाकी चोरल्या असल्याची कबुली देखील पोलिसांना दिली. आपली पत्नी आजारी असून तिच्या उपचारासाठी आपण दुचाकीची चोरी करीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आणि चोरलेल्या दहा दुचाकी देखील त्याने पोलिसांना दिल्या. ('He' steals a bike for his wife's illness)
कमी पैशात दुचाकी
चोरलेल्या दुचाकी शफी अत्यंत कमी किमतीत विकायचा. हॅन्डल लॉक असलेल्या दुचाकी कशा प्रकारे चोरायचा याची त्याला माहिती नसल्यामुळे तो लॉक नसलेल्या दुचाकींचा चोरायचा. चोरलेल्या दुचाकीची नंबर प्लेट काढून तो ही दुचाकी कुणाकडे तरी गहाण ठेवून काही रक्कम घ्यायचा. या पैशावर तो पत्नीच्या औषधाचा खर्च भागवायचा अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
दहा दुचाकी मिळाल्या
पेंटर शफी यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी पोलिसांनी मिळवल्या असून शफीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे. नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि चेसी, इंजिन क्रमांक यावरून पोलिसांनी दुचाकींची ओळख पटवली आहे. चोरी करण्याचे कारण जरी मन हेलावणारे असले तरी शेवटी गुन्हा हा गुन्हाच असतो त्यामुळे कायदेशीर कारवाईला शफीला सामोरे जावे लागत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !