एका महिलेने देशमुख यांच्यावर मोठा आणि गंभीर आरोप केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि लाखो लोकांनी तो पहिला आहे. या व्हिडीओत देशमुख हे एका खोलीत बेडवर बसलेले आहेत आणि सदर महिला त्यांच्याकडे बोट दाखवत याने आपली फसवणूक केल्याचे सांगत आहे. हे सांगताना सदर महीला रडत आहे. या व्हिडीओने प्रचंड खळबळ उडवून दिली असतानाच एक ऑडीओ क्लिप देखील व्हायरल झाली आणि या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट झाल्या. श्रीकांत देशमुख यांनी त्यापूर्वीच हनी ट्रॅप ची केस पोलिसात दाखल केलेली होती. देशमुख हे या प्रकरणात मोठे अडचणीत येत असतानाच भारतीय जनता पक्षाने त्यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा तडकाफडकी घेतला होता.
सदर प्रकरण भलतेच गंभीर असल्यामुळे राजीनाम्यापुरते हे थांबणार नाही हे दिसत असतानाच सदर महिला आता अधिकच आक्रमक झाली असून या महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. पुण्याच्या डेक्कन पोलिसांनी श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तो सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला आहे. आता देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे परंतु देशमुख हे पोलिसांच्या हाती लागताना दिसत नाहीत. सोलापूर येथील सदर बाजार पोलिसांनी देशमुख याना पकडण्यासाठी फौजदार सचिन माळी यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले असून या पथकात एका महिला कर्मचाऱ्यासह पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे.
संशयित आरोपी श्रीकांत देशमुख हा सांगोला तालुक्यातील जवळा या गावचा असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी त्याच्या मूळ गावी जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो आढळून आला नाही. देशमुख लपून बसला असल्याचा संशय पोलीस व्यक्त करू लागले आहेत. लग्नाचे आमिष दाखवत श्रीकांत देशमुख याने ३२ वर्षीय महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह तसेच पुणे, मुंबई येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये वेळोवेळी अत्याचार केला तसेच आपली फसवणूक केली, विवाहाचा बनाव देखील केला अशा प्रकारची तक्रार पीडित महिलेने देशमुख याच्या विरोधात केली आहे.
पीडित महिलेच्या तक्रारींवर सोलापूर पोलिसांकडे गुन्हा वर्ग होताच सदर बाजार पोलीस सक्रिय झाले असून आरोपी देशमुख याचा शोध सुरु करण्यात आला आहे. केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात चर्चा होत असलेल्या या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. (Solapur Police in search of Srikant Deshmukh) पोलीस त्याच्या शोधात कुठे कुठे जातात आणि आरोपी देशमुख हा कधी पोलिसांच्या हाती लागतोय याकडे महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !