BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ जुलै, २०२२

होय गद्दारच ....... असेल हिंमत तर हात लावून दाखव !

 



सोलापूर : सद्या राजकारणात गद्दार हा शब्द बहुचर्चित झाला असून सोलापूरच्या एका तडफदार शिवसैनिकाने आमदार बांगर यांना खुले आव्हानच दिले आहे. 'होय गद्दारच ! हिंमत असेल तर हात लावून दाखव असे प्रतिआव्हान अतुल भवर यांनी दिले आहे.


राजकरण आणि गद्दारी यांचा किती जवळचा संबध आहे हे गेल्या काही दिवसात दिसून आले असून काही मुठभर अवघा महाराष्ट्र गद्दारांचा निषेध करू लागला आहे. शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपशी संधान साधून सत्ता प्राप्त केली आहे. शिवसेनेतून फुटून गेलेल्यांचे भवितव्य काय असते याची साक्ष देणाऱ्या अनेक घटना इतिहासात नमूद झाल्या आहेत. 


चाळीस आमदारांचा गट फुटलेला असताना राज्यातील काही पदाधिकारी देखील शिंदे गटात दाखल होत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने ज्यांना भरभरून दिले आहे ते देखील गद्दारांच्या यादीत समाविष्ठ होताना पाहायला मिळत आहेत आणि शिवसेनेबाबत जनमानसात सहानुभूती अवतरताना दिसत आहे. आमदारांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटात दाखल होऊ लागले आहेत. त्यातच शिवसेनेसाठी काहीही योगदान न दिलेले असंतुष्ठ आत्मे देखील या संधीचा फायदा घेताना दिसत आहेत. 


एकनाथ शिंदे यांचा गट फुटल्यापासून गद्दार हा शब्द अधिक वापरला जात असल्याचे दिसत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बंडखोर गट घेत आहे पण 'माझ्या उद्धवला सांभाळा' असे कळकळीचे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरच्या टप्प्यात केले होते याची आठवण अवघा सोशल मीडिया करून देताना दिसू लागला आहे. बंडखोरी करून सत्ता स्थापन झाली असली तरी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी या सरकारचे भवितव्य ठरणार आहे. शिवसेनेच्या तिकिटावर आणि पाठबळावर आमदार झालेले शिवसेनेलाच आव्हान देत असल्याने त्यांना गद्दार म्हटले जात आहे परंतु हा शब्द काही बंडखोर आमदारांना भलताच लागू लागला आहे. 


बंडखोर आमदारांनी परत शिवसेनेत यावे म्हणून आक्रोश करणारे आमदार संतोष बांगर हे धक्कादायकरित्या शिंदे गटात दाखल झाले. आता हेच आ. बांगर शिवसेनेच्या रोषाला बळी पडताना दिसत आहेत. शिवसैनिकातून त्यांना खुले आव्हान दिले जाऊ लागले असून समाज माध्यमांवर तर अत्यंत सणसणीत प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अत्यंत कडवट प्रतिक्रिया व्यक्त होत असून या व्यासपीठावर व्यक्त होणारे राजकीय नव्हे तर सर्वसामान्य मराठी माणूस असल्याने वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. संतप्त लोकभावना आगामी राजकारणाची दिशा देखील स्पष्ट करणारी ठरू लागली आहे.


कधी काळी राजकारण निष्ठेवर मजबूत असायचे पण आता निष्ठा हा शब्द देखील बेईमान होताना दिसत आहे. त्यामुळे सच्चे शिवसैनिक फुटलेल्या आमदारांना गद्दार म्हणू लागला आहे. याच शब्दावर आक्षेप घेत आमदार संतोष बांगर यांनी आपला संताप व्यक्त केला आणि गद्दार म्हणणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढण्याची भाषा त्यांनी वापरली. तेथून बांगर हे अधिक निशाण्यावर आले आणि टीकेचे धनी बनले आहेत. ज्या शिवसैनिकांच्या मतावर आणि कष्टावर बांगर हे आमदार झाले त्याच शिवसैनिकांच्या कानाखाली आवाज काढण्याची भाषा वापरली गेल्याने शिवसैनिक केवळ दुखावलेच नाहीत तर संतप्त देखील झाले आहेत आणि आ. बांगर यांना पुन्हा पुन्हा गद्दार म्हणून डिवचू लागले आहेत. सोलापूर येथील जेष्ठ शिवसैनिक अतुल भवर यांनी तर पुन्हा पुन्हा गद्दार म्हणत आव्हानच देवून टाकले आहे. 


शिवसेनेला आव्हान देणारी औलाद मुळात हिंदुस्थानात अजून जन्माला आली नाही, संतोष बांगर हे गद्दार असून त्यांच्या तोंडी अशोभनीय भाषा आहे. तू खरच मर्द असशील तर मी हज्जार वेळा तुला गद्दार म्हणतो, हिंमत असेल तर या अतुल भवरला हात लावून दाखव अशा शब्दात भवर यांनी आ. बांगर यांना आव्हान दिले आहे.  सोलापुरातच नाही तर महाराष्ट्रात कुठेही बोलाव, तेथे यायला मी तयार आहे पण हिंमत असेल तर हात लावून दाखवच ! इमान सोडले नसलेले लाखो शिवसैनिक महाराष्ट्रात आजही आहेत असे देखील भवर यांनी म्हटले आहे  आणि या आव्हानाची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. 


खरा शिवसैनिक सेनेतच 
बाहेरून आलेले लोक शिंदे गटात सहभागी झाले आहेत पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि उद्धव साहेब यांचा शिवसैनिक मातोश्रीचे इमान राखतो, तो शिवसेना सोडून गेलेला नाही. (Atul Bhawar's open challenge to MLA Bangar)बांगर यांच्यासारख्या लोकांना शिवसैनिकांनी रस्त्यावरून उचलून आमदार केले आणि मोठी पदे मिळवून दिली आहेत त्याच शिवसैनिकांना मारण्याची भाषा करणारे हे कोण? संतोष बांगर यांच्यात हिंम्मत असेल तर एका शिवसैनिकांच्या केसाला हात लावून दाखवावा असा पुनरुच्चार देखील भवर यांनी केला आहे. 


हे देखील वाचा :>>>

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !