पुणे : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात पाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी सुत जमवत राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. शिवसेना फोडून गेलेल्या सर्व आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रात संतप्त वातावरण असून त्यांना आपल्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याचे सतत समोर येत आहे. शिवसैनिक 'गद्दार' अशा शब्दात त्यांची अवहेलना करीत आहेत. एकीकडे शिवसेना पक्ष देखील फोडण्याचा आटोकाट प्रयत्न होत असताना दुसरीकडे निष्ठावान शिवसैनिक आक्रमक होत आहेत. पक्षातून फुटून गेलेल्या आमदारांना पुढची निवडणूक कठीण जाणार असल्याचे म्हटले जात असतानाच सद्याही सच्च्या शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. फुटीर लोकप्रतिनिधीना केंद्र सरकारची सुरक्षा पुरवली जात आहे.
राज्यातील चाळीस आमदार यांनी बंड केले आणि आता शिवसेनेच्या मतावर आणि तिकिटावर निवडून आलेले १२ खासदार देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेले आहेत. पुण्याच्या शिरूर मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शिरूर मतदार संघातील शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी आज एक मोठे आंदोलन केले. या आंदोलनावेळी आढळराव यांचे हातपाय तोडण्याची धमकी शिवसैनिकांनी दिली. धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर राजगुरूनगर पोलिसांनी याप्रकरणी १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आढळराव पाटील यांच्या भूमिकेचा निषेध करीत पुणे - नाशिक महामार्गावर संतप्त शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. आढळराव पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर 'गद्दार आढळराव' असे लिहित निषेध केला. आढळराव पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन देखील शिवसैनिकांनी केले. आढळराव पाटील यांची बदनामी होईल अशा पद्धतीने शिवसैनिकांनी कृत्य तर केलेच पण त्यांच्या लांडेवाडी येथील घरी जाऊन त्यांचे हातपाय तोडू अशी धमकी दिल्याची तक्रार अंकुश शेवाळ यांनी पोलिसात दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे आणि माजी तालुकाप्रमुख गणेश सांडभोर यांच्यासह १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !