मंगळवेढा : अवघ्या नऊ वर्षे वयाच्या बालिकेवर अत्याचार करणारा 'तो' डॉक्टर हा बोगस डॉक्टर असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे पुन्हा वेगळीच खळबळ उडाली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे अवघ्या ९ वर्षीय बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची बाब कालच समोर आली होती. याप्रकरणी कथित डॉक्टर हरी पत्की याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली आहे. खाजगी शिकवणीसाठी सदर बालिका निघालेली असताना तिला बोलावून, खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने मंगलवेढा तालुका हादरून गेला आहे. ही घटना उजेडात आल्यावर डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या हरिप्रसाद पत्की याला लोकांनीही 'प्रसाद' दिला असल्याचे सांगितले जात आहे. पत्की याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७६ (अ) (ब), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार पत्की याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करण्यात आलेले आहे.
एका डॉक्टरकडून हे अमानवी कृत्य घडल्याने जनमानसात प्रचंड संताप आणि चीड निर्माण झाली आहे परंतु पत्की हा खराखुरा डॉक्टर नसून तो एक बोगस डॉक्टर असल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. हा पत्की डॉक्टर आहे असे भासवत रुग्णांवर उपचार करीत होता. सलगर बुद्रुक सारख्या प्रगत गावात एक बोगस डॉक्टर कार्यरत असूनही प्रशासनाने त्यावर कशी कारवाई केली नाही असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. (The rapist doctor revealed to be a bogus doctor) हा बोगस डॉक्टर सुमारे १८ वर्षांपासून या गावात रुग्णावर उपचार करीत राहिला आहे.
प्रशासनावर सवाल
जवळपास अठरा वर्षांपासून हा पत्की सलगर सारख्या गावात रुग्णांवर वैद्यकीय उपचार करीत आहे तरीही हा बोगस डॉक्टर असल्याची माहिती प्रशासनाला कशी मिळाली नाही हा सवाल आता उपस्थित झाला आहे. तालुक्यातील आरोग्य विभाग तसेच प्रशासन एवढी वर्षे गप्प कसा राहिला, एवढी गंभीर बाब प्रशासनाच्या नजरेतून कशी सुटली ? एवढ्या वर्षात अनेक अधिकारी आले आणि गेले पण त्यातील एकालाही याचा सुगावा कसा लागला नाही असे सवाल सर्वसामान्य नागरिक देखील आता विचारू लागले आहेत.
आधी होता कंपाउंडर !
पत्की हा सलगर बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्या हाताखाली कंपाउंडरचे काम करीत होता अशी देखील माहिती आता समोर आली आहे. येथे काम केल्याच्या नंतर त्याने काही बोगस कागदपत्र जमा केली आणि आपण डॉक्टर आहोत असा आभास त्याने निर्माण केला आणि सलगर येथे आपले एक रुग्णालय थाटून तो रुग्णांच्या जीवाशी खेळत राहिला. हा बोगस डॉक्टर आहे हे समजल्यावर गावकरी देखील हादरून गेले आहेत.
'लायकी' माहित होती !
या पत्कीची वाईट वर्तनाची 'लायकी' गावकऱ्यांना आधीच माहित होती, त्याने याआधी देखील गावातील काही मुलांशी विकृत कृत्ये केली होती त्यामुळे गावकऱ्यांनी त्याला चोप देऊन समज दिली असल्याचेही आता सांगण्यात येत आहे. आता तर केवळ ९ वर्षे वयाच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आणि त्यापाठोपाठ हा पत्की बोगस डॉक्टर असल्याचीही मोठी माहिती उघडकीस आली आहे.
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !