मुंबई : नव्या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार असतानाच आता भविष्यवाणी देखील होऊ लागली असून शिंदे - फडणवीस सरकार हे सहा महिन्यात कोसळणार असल्याचे भविष्य एका ज्योतिषाने सांगितले आहे त्यामुळे हे सरकार अजून स्थिरस्थावर व्हायचे आहे तोच ते पडण्याचे अंदाज होऊ लागले आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार बंडखोरीने खाली खेचण्यात आले आणि नवे शिंदे - फडणवीस सरकार आरूढ झाले परंतु संख्याबळ असताना भाजपचे फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने काही काळे बेरे असण्याची शक्यता पहिल्या दिवसांपासूनच व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी फडणवीस यांनी गेल्या काही काळात, विशेषत: मागील पंधरा दिवसात एवढे परिश्रम घेतले आणि ऐनवेळी हे पद त्यांच्यापासून दूर तर गेलेच पण कनिष्ठ नेत्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली. फडणवीस यांची नाराजी लपून तर राहिली नाहीच कारण त्यांच्या चेहऱ्यावरून या नाराजीचे प्रदर्शन होत आहे. शिवाय त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकावरून अचानक भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह यांचे छायाचित्र देखील गायब झाले आहे. नागपूर येथे देखील आज हेच पाहायला मिळाले.
शिवसेना फोडून सत्तेवर आलेले हे सरकार अधिक काळ टिकणार नाही याबाबत राजकीय जाणकार उघडपणे बोलत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील काळे बेरे असण्याची शक्यता जाहीरपणे व्यक्त केली आहे. आता तर एका ज्योतिषानेच भाकीत केले असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सहा महिन्यात पडणार असल्याचे भविष्य सांगितले असल्याचे पाटील यांनी थेट शरद पवार यांनाच सांगितले आहे.
नव्या सरकारचा आता कुठे शपथविधी झाला आहे आणि अजून या सरकारचे मंत्रीमंडळ स्थापन व्हायचे आहे. मंत्रीमंडळ, खातेवाटप होणे बाकी असताना आणि सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी काही दिवसांवर असताना सरकार पडण्याचे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) बैठकीतच जयंत पाटील यांनी ही माहिती शरद पवार यांना दिली आहे. शरद पवार यांनी मात्र "आपला ज्योतिषावर विश्वास नाही" असे सांगितले. (Big prediction for a new Shinde government)
शरद पवार यांचाही दावा !
राष्ट्रवादीचे प्रमुख आणि राजकारणातील जुने मुरब्बी खेळाडू शरद पवार यांनी तर आपल्या पक्षाला मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश आधीच दिले आहेत. हे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचे आणि मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे शरद पवार यांनी आधीच म्हटले आहे. ज्योतिषावर आपला विश्वास नाही असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले असले तरी त्यांच्या अनुभवातून त्यांनी हे सरकार अधिक काळ अस्तित्वात राहणार नसल्याचे म्हटले आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !