सांगली : म्हैसाळ येथील ९ जणांच्या हत्येप्रकरणी आणखी एक खुलासा झाला असून मांत्रिकाने ९ बाटल्यातून विष प्यायला दिले होते तसेच मांत्रिकाच्या घरातून अनेक पुरावे देखील पोलिसांच्या हाती आले आहेत.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. सख्या दोन भावांच्या कुटुंबातील ९ जणांचे मृतदेह घरातच आढळून आले होते. यावेळी ही सामुदायिक आत्महत्या असल्याचे मानले गेले होते परंतु नंतर हे प्रकरण आत्महत्येचे नसल्याचे उघडकीस आले होते. अंधश्रद्धेतून ही घटना घडल्याचे देखील समोर आले होते. अवघा महाराष्ट्र या घटनेने हादरून गेला होता. सदर ९ जणांना जेवणातून विष दिले गेल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आणि हे पाप करणाऱ्याचे पितळ देखील उघडे पडले होते. आता मात्र अधिक माहिती समोर आली असून या ९ जणांना विषाच्या ९ बाटल्यातून विष पिण्यास दिले गेल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे तसेच मांत्रिकाच्या घरात देखील काही पुरावे मिळाले आहेत.
वनमोरे कुटुंब गुप्तधनाच्या मागे लागले होते आणि ते प्राप्त करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून मांत्रिकाला पैसे दिले जात होते. मांत्रिक पैसे तर घेत होता पण गुप्तधन मिळवून देत नव्हता त्यामुळे वनमोरे कुटुंबाने मांत्रिकाकडे तगादा लावला होता. या तगाद्याला वैतागून मांत्रिकाने ९ जणांची हत्या घडवली. याप्रकरणी अब्बास बागवान आणि धीर सरवडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकाच वेळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे दिसून आले असून यात डॉक्टर माणिक यलप्पा वनमोरे, त्यांची आई अक्काताई वनमोरे, पत्नी रेखा माणिक वनमोरे, मुलगी प्रतिमा वनमोरे, मुलगा आदित्य वनमोरे, शिक्षक पोपट यलाप्पा वनमोरे, त्यांच्या पत्नी अर्चना वनमोरे, मुलगी संगीता वनमोरे, मुलगा शुभम वनमोरे अशा ९ जणांचा मृत्यू झाला आहे. आर्थिक अडचणीतून आत्महत्येची ही धक्कादायक घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती पण नंतर हळूहळू उलघडा झाला आणि खुनाचा गुन्हा दाखल करणायत आला. सुरुवातीला आत्महत्या वाटणारा हा प्रकार अंधश्रद्धा, गुप्तधन आणि त्यातून खून अशा प्रवासातून पुढे गेला. (Mahisal case, Poison was given in nine bottles)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !