BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जुलै, २०२२

उजनी धरणात वेगाने जलसंचय !

 



पंढरपूर :: पावसाळा लांबल्याने उजनी धरणाबाबत चिंता व्यक्त होत असतानाचा जुलै महिन्यात उजनी धरण ६५ टक्क्यावर पोहोचले असून गेल्या काही दिवसात धरणात वेगाने पाणी साठा वाढला आहे. 


यावर्षी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस अपेक्षित होता परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. संपूर्ण जून महिना पावसाची प्रतीक्षा करावी लागली त्यामुळे चिंतेचे ढग जमा झाले होते. जुलै महिन्यात मात्र राज्याच्या विविध भागात दमदार पाउस झाला आणि नदी नाले तुडुंब झाले. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि पावसामुळे शंभरावर बळी देखील गेले आहेत. धरणाच्या पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच जवळपास सर्वच धरणातील पाण्याची पातळी अत्यंत वेगाने वाढली आणि आशादायक चित्र निर्माण झाले आहे. अजून पावसाळा शिल्लक असून धरणे शंभर टक्के भरण्याची आशा निर्माण झाली आहे. 



पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून खडकवासला धरण देखील भरले आहे. पुणे जिल्ह्यातील या पावसामुळे धरणातून पाणी सोडले जात असून उजनी धरणात चांगला विसर्ग सुरु आहे. उजनी धरणात ९९ टीमसीपेक्षा अधिक पाणी साठा झाला असून आज हा साठा शंभर टीमसी होईल. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे उजनी धरणाची पातळी ६५ टक्क्यावर अत्यंत वेगाने पोहोचली असल्याने यावर्षीही उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचे संकेत मिळत आहेत. सोलापूरसह अनेक जिल्ह्यांच्या नजरा उजनी धरणाच्या पाणी पातळीकडे असते आणि यावेळी जुलै महिन्यातच उजनी ६५ टक्क्यावर पोहोचले असल्यामुळे साहजिकच अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळालेला आहे. 

जून महिन्यात पाऊस नसल्याने उजनी धरणाचे काय होणार ? हा प्रश्न अनेकांच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. संपूर्ण जून महिना कोरडा गेला आणि आकाशात पावसाचे ढग नसले तरी मनामनात चिंतेचे ढग मात्र जमा झालेले होते. याच जुलै महिन्यात ८ जुलै रोजी उजनीचा पाणी साठा मायनस ६.८४ टीमसी झाला होता. केवळ पंधरा दिवसांच्या कालावधीत ४२.१८ टीमसी पाणी उजनी धरणात पोहोचले असून सद्य ३५ टीमसी एवढा जिवंत साठा उजनी धरणात झालेला आहे. (Rapid accumulation of water in Ujani Dam) त्यामुळे यंदाही उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा निर्माण झाली आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !