सोलापूर
: सोलापूर - गाणगापूर एस टी बसला अक्कलकोटजवळ मोठा अपघात झाला असून या
अपघातात ३६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे आदेश
शासनाने दिले आहेत.
अलीकडे अपघात ही नित्याचीबाब झाली असून खाजगी वाहनांना मोठे अपघात होत आहेतच परंतु एस टी बस देखील अपघातग्रस्त होऊ लागल्या असून सुरक्षित वाटणारा एस टी प्रवास देखील आता असुरक्षित ठरू लागला आहे. सोलापूर - गाणगापूर बसला अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावर एका वळणावर मोठा अपघात आज झाला आणि यात जवळपास ३६ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील ४ प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून यातील काही जखमींना अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात तर काही जखमी प्रवाशांना सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर असल्यामुळे मदतीसाठी खाजगी डॉक्टरना देखील येथे बोलाविण्यात आले आहे.
अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावर देशमुख फार्म जवळ हा अपघात झाला असून अपघात झालेल्या बसमध्ये ७० प्रवाशी प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली आहे. सदर बस पुलावरून जात असताना अचानक एस टी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पलटी होऊन हा अपघात झाला. अपघात होताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धाऊन गेले आणि त्यांनी जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.
आर्थिक मदत जाहीर
सदर अपघातात जखमी झालेल्या
प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. जखमीवर
शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करण्याचे निर्देश देखील प्रशासनाला देण्यात आले
असून गंभीर दुखापत अथवा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५०
हजार रुपयांची अधिकची मदत देण्यात यावी असे देखील निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी
दिले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !