पंढरपूर : साखर कारखान्याच्या निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच दामाजी सहकारी साखर कारखान्यासह सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ साखर कारखान्याच्या विरोधात आरसीसी अंतर्गत कारवाई सुरु करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना यांच्यासह अन्य काही सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा बॉयलर पेटलेला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूक तर विविध कारणांनी गाजत असून तालुकाभर रणधुमाळी सुरु आहे. आरोप प्रत्यारोपाची राळ उडताना दिसत असून अनेकांना कारखान्याचे संचालक बनण्याची इच्छा अनावर झालेली दिसत आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या आधीपासूनच वादात सापडला असून या कारखान्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे आणि यावर्षी विठ्ठल कारखाना सुरु होऊ शकला नाही. मागील गळीत हंगामासाठी ऊस दिलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप ऊसाची बिले मिळू शकली नाहीत त्यामुळे सभासद शेतकरी नाराज आहेत. साखर कारखाने वेगवेगळ्या अडचणीत येत असतानाच आता सोलापूर आणि उसमानाबाद जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यावर आरसीसी अंतर्गत कारवाई सुरु करण्यात आली आहे.
सोलापूर प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यावर ही कारवाई करण्यासंदर्भातील प्रस्ताव साखर आयुक्त यांच्याकडे सादर केला आहे. येत्या ६ जुलै रोजी याची सुनावणी घेतली जाणार आहे. यावर्षी गाळप केलेल्या साखर कारखान्यापैकी १८ कारखान्यांनी ऊसाची बिले शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. सूचना देवूनही कारखाने शेतकऱ्यांची देणी थकवत आहेत. नोटीसा दिल्या तरीही कारखाने एफआरपीची रक्कम देत नसल्यामुळे सोलापूर प्रादेशिक संचालकांनी साखर आयुक्त यांच्याकडे आरसीसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर येत्या ६ जुलै रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड हे सुनावणी घेणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील दामाजी सहकारी साखर कारखाना (३० कोटी ३८ लाख), भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर (२८ कोटी), लोकनेते बाबुराव पाटील अनगर (३२ कोटी २६ लाख) , मकाई सहकारी (१२ कोटी २८ लाख), सिद्धेश्वर, तिऱ्हे (२८ कोटी २६ लाख), जकराया (१० कोटी), इंद्रेश्वर शुगर (३१ कोटी ३८ लाख), गोकुळ, धोत्री (५ कोटी २६ लाख), बबनराव शिंदे, तुर्कपिंपरी ( २४ कोटी), ओंकार, चांदापुरी (४ कोटी १४ लाख), विठ्ठल रिफायनरी पांडे ( ५२ कोटी २५ लाख), जयहिंद शुगर (७२ कोटी), आष्टी शुगर (१६ कोटी ११ लाख), सीताराम महाराज खर्डी ( ६ कोटी), धाराशिव शुगर सांगोला (६ कोटी), शंकर सहकारी (७ कोटी १७ लाख), सिद्धेश्वर सहकारी कुमठे (२८ कोटी ५१ लाख) आणि विठ्ठल कार्पोरेशन (९ कोटी ) या कारखान्यांवर ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. (RCC action on sugar factory started)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !