BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ जुलै, २०२२

सोलापूर जिल्ह्यात तांब्याची वायर चोरणारी टोळी गजाआड !





सोलापूर : तांब्याची वायर चोरणाऱ्या एका टोळीचा छडा लावण्यात सोलापूर पोलिसांना यश आले असून या टोळीकडून साडे बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


गेल्या काही वर्षात चोरांचे वेगवेगळे प्रकार समोर आले असून पैसा, सोने याचीच नव्हे तर कशाचीही चोरी होऊ शकते हे दर्शविणाऱ्या काही घटना समोर आल्या आहेत. रस्त्यावरील फसवाफसवीपासून बँकांचे एटीम मशीन फोडण्यापर्यंत चोऱ्या होत असतात. कृषी सेवा केंद्र आणि मोटार वाईंडिंगची दुकानेही फोडली जातात. अशा दुकानातून चोरटे काय चोरणार ? असा एक समज असतो पण ही दुकानेही सुरक्षित नसून अशा दुकानातून तांब्याच्या तारा चोरल्या जातात हे समोर आलेले आहे. अशा चोऱ्या करणारी एक टोळी सोलापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली असून त्यांच्याकडून काही चोऱ्या उघडकीस आणल्या गेल्या आहेत. या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे.


पंढरपूर, सांगोला, टेंभुर्णी, नातेपुते, करमाळा, वेळापूर, मोहोळ, कुर्डूवाडी  अशा विविध ठिकाणी गेल्या काही काळात अशा चोरीच्या घटना घडल्या होत्या. मोटर वाईंडिंग करणारी दुकाने फोडून तांब्याची वायर आणि मोटारी चोरी गेल्या होत्या. करमाळा तालुक्यातील वांगी येथील राहुल यादव यांनी अशा चोरीबाबत करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शेलगाव (करमाळा) येथील साईराज कृषी सेवा केंद्रात ११ जून रोजी अशाच प्रकारे चोरी करण्यात आली होती. दुकानाचे शटर उचकटून सबमार्सीबल मोटारीचे तांब्याच्या वायरचे चार बंडल, दोन लहान बंडल आदी साहित्याची चोरी करण्यात आली होती.  तांब्याची वायर आणि मोटार चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना माळशिरस परिसरातील एक टोळी सक्रीय असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास केला आणि त्यांना एका टोळीबाबत अधिक माहिती मिळत गेली. 


पोलिसांनी सवतगव्हाण येथील अमोल शंकर पवार (वय २२), अकलूज येथील दिगंबर माने (वय ३२) आणि शशिकांत पवार (वय २३ ) यांना अटक केली आणि अधिक तपास सुरु केला. त्यानुसार या तिघांच्यासह म्हाळुंग येथील विजय उर्फ विजू काळे, सवतगव्हाण येथील गोपी चव्हाण, दत्तू चव्हाण, सुरेश चव्हाण हे देखील असल्याचे निष्पन्न झाले परंतु ते मात्र पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले आहेत. या सर्वांच्या टोळीने अकरा ठिकाणी चोऱ्या केल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Gang stealing copper wire arrested by police) अटक केलेल्या तिघांच्या कडून पोलिसांनी चोरीच्या तांब्याच्या तारा, एक दुचाकी, चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा एकूण बारा लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.   





.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !