BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जुलै, २०२२

पंढरपूर तालुक्यात सव्वा कोटी हडप ! चौकशीचे आदेश !!

 


पंढरपूर : वृक्षलागवड कार्यक्रमात पंढरपूर तालुक्यात तब्बल सव्वा कोटी रुपये हडप केल्याचा आरोप केल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 


शासनाच्या वृक्षलागवड योजनेबाबत नेहमीच चर्चा आणि आक्षेप घेतले जातात. वृक्ष लागवड योजनेवर जनतेचा प्रचंड पैसा खर्च केला जातो परंतु प्रत्यक्षात लावण्यात आलेली झाडे दिसत नाहीत. दरवर्षी जुलै महिन्यापासून हा उपक्रम राबविण्यात येतो. गेल्या काही वर्षात कोट्यावधी झाडे लावल्याचे सरकारी कागदात दिसते परंतु प्रत्यक्षात ही झाडे दिसत नाहीत. ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत भारतीय जनता पक्षावर सतत टीका होत राहिली आहे. आणि आता तर केवळ पंढरपूर तालुक्यातच सव्वा कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. सन २०२९-२० मध्ये महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात हा गैरप्रकार झाला असल्याचा आरोप दादासाहेब चव्हाण यांनी केला आहे. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.


सामाजिक वनीकरण विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांसह आठ जनांनी मिळून खोटी कागदपत्रे तयार करून बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने १ कोटी २५ लाख रुपये हडप केले असल्याबाबत आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशी करण्याचे आदेश पंढरपूर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी दिले आहेत त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम  २०१९-२० मध्ये राबविला होता. या उपक्रमांतर्गत पंढरपूर शहर आणि तालुक्यात प्रमुख रस्ते, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात शासनाच्या नियमाप्रमाणे हा उपक्रम राबविण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


सदर उपक्रम राबविताना तत्कालीन वनरक्षक संतोष नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर अहिरे, वनमजूर अंबन्ना जेऊरे यांनी संगनमत करून नियोजनाच्या अर्धवट झाडांची लागवड केली. या कामांसाठी काही मजूर दाखवले पण प्रत्यक्षात हे मजूर कामावर नव्हतेच. अभिजित गायकवाड, प्रवीण जाधव, लक्ष्मण साळवी, जयसिंग नागणे, अनिल गायकवाड, मयूर गायकवाड, राणी गायकवाड, प्रताप गायकवाड, वनिता दानवले, स्वाती दानवले यांना बनावट मजूर दाखवून त्यांच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली आणि प्रत्यक्षात त्यांच्या सह्या न घेताना बनावट अंगठे उठवून, बोगस सह्या करून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप दादासाहेब चव्हाण यांनी केला आहे. (Fraud in tree planting in Pandharpur taluka) चव्हाण यांनी पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे तक्रार दाखल केली गेली नसल्याचे त्यांनी न्यायालयात धाव घेतली.  पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश आता पोलिसांना दिला आहे. 


म्हणून न्यायालयात ...!

दादासाहेब चव्हाण यांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी याबाबत टाळाटाळ केली असल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी रजिस्टर पोस्टाने पोलिसांना तक्रार दिली परंतु तरीही पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने विविध कलमान्वये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश बजावले आहेत.      

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !