BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जुलै, २०२२

राज्यपालांनी नको तिथं 'शहाणपणा' करू नये !



मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नको तिथं शहाणपणा करू नये" असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुनावले आहे तर राज्यपालांच्या विधानावर साधा निषेध तरी व्यक्त करा असा सल्ला शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. 


राज्यपाल हे संविधानिक पद असून या पदाचा मान प्रत्येकाने राखायचा असतो. या पदावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने देखील आपल्या पदाचा सन्मान राखायचा असतो परंतु महाराष्ट्रात कधी नव्हे एवढे विद्यमान राज्यपाल यांच्याबाबत बोलले जात आहे. राज्यात पहिल्यांदाच असे घडत असून काही वक्तव्य वादग्रस्त देखील ठरलेली असताना पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात मुंबईबाबत वादग्रस्त विधान केले आणि त्याचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. "मुंबईतून गुजराती माणूस गेला तर मुंबईत पैसाच राहणार नाही" असे विधान राज्यपाल कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आणि या विधानावर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अत्यंत परखडपणे खडे बोल सुनावले आहेत. राज्यपालांनी नको त्या गोष्टीत शहाणपणा करू नये, आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही तर नको त्या गोष्टीत राज्यपाल यांनी आपलं न आक खुपसण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र, मुंबईच्या प्रगतीत मराठी माणसांचा सहभाग आहे. बाकी लोक इथे आले आणि त्यांनी स्वत:ची प्रगती करून घेतली. मुंबई ही १०५ हुतात्म्यांमुळे महाराष्ट्रात आली आहे. ज्याबाबत माहिती नाही अशा गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये असे आमचे स्पष्ट मत आहे असे सणसणीत बोल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सुनावले आहेत.  राज्यपाल म्हणून आला आहात तर आम्ही तुमचा आणि पदाचा आदर करतो, गुण्यागोविंदाने त्यांनी महाराष्ट्रात राहावे, असे देखील देशपांडे यांनी म्हटले आहे. 


 आता तरी ऊठ मराठ्या ऊठ. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत, मराठ्या तुलाच उठावे लागेल - खा. संजय राऊत


शिवसेनेने देखील वादग्रस्त विधानाबाबत संताप व्यक्त केला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्ष करीत असल्याचे आणि मराठी माणसाना दुबळे करण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेहमीच करीत आहे. भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेत येताच पुन्हा असा प्रयत्न सुरु झाला आहे असे देखील म्हटले जाऊ लागले आहे. त्यातच राज्यपाल यांनी केलेल्या विधानावर शिवसेना संतापली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधून 'राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर त्यांचा साधा निषेध तरी करा' असे म्हटले आहे. 


महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरु झाला, यावर स्वाभिमान आणि अभिमान सांगत शिवसेनेतून बाहेर पडलेला गट गप्प बसणार असेल त्यांनी शिवसेनेचे नाव घेवू नये, मुख्यमंत्री शिंदे, राज्यपालांचा साधा निषेध तरी करा, मराठी, कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Controversial statement of the Governor, backlash in Maharashtra)


भाजपकडून समर्थन !

राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच भारतीय जनता पक्षाने राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी 'राज्यपाल यांच्याकडून कोणाचाही अपमान झाला नाही, त्यांनी त्या त्या समाजाला योगदानाचे श्रेय दिले आहे असे राणे यांनी म्हटले आहे.


शिंदे गट नाराज !

राज्यपालांनी केलेल्या विधानाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांचे हे विधान राज्याचा अपमान करणारे असून याबाबत आपण केंद्राकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. मुंबईचे मूळ मराठी असून मुंबईच्या उभारणीत सर्वाधिक वाटा मराठी माणसांचाच आहे असे केसरकर यांनी म्हटले आहे. राज्यपालांच्या त्या विधानाचा शिंदे गटाने निषेध व्यक्त केला आहे.


दिल्लीला खुश करण्यासाठी !

राष्ट्रवादीचे परदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली असून दिल्लीतील बॉसना खूष करण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे म्हटले आहे. घटनात्मक पदावरील व्यक्तीनी जपून बोलण्याचे संकेत आहेत. काही महामहीम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीत बसलेल्या बॉसना खुश करण्यासाठी चांगलाच चंग बांधलेला आहे. राज्यातील मराठी कष्टकरी जनतेच्या कष्टावर मुंबई उभी असून परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नाही. दुसऱ्या राज्याबाबत प्रेम असलेल्यांनी तिकडे जाऊन खुशाल राहावे. महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून मराठी माणसांचा अपमान राज्यपाल करीत आहेत. भारतीय जनता पक्षाला हे विधान मान्य आहे काय ? असा सवाल देखील पाटील यांनी विचारला आहे.


दुसरीकडे पाठवा !

राज्यपालांना महाराष्ट्राबाबत प्रेम नाही त्यामुळे त्यांना दुसरीकडे पाठवा अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. राज्यपाल कोश्यारी सातत्याने महाराष्ट्रद्रोही विधाने करीत असून त्यांना महाराष्ट्राबाबत आपुलकी नाही. अशा व्यक्तींना येथे ठेवून काय फायदा आहे? याचा विचार राष्ट्रपतींनी करावा असे ठाकूर यांनी म्हटले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !