BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ जुलै, २०२२

सावधान ! सोलापूर जिल्ह्यात वाढतोय कोरोना !




सोलापूर : महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असून वेळीच सावधानता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 


राज्याच्या विविध भागात गेल्या महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून छोट्या लाटेची चाहूल लागू लागली आहे. चौथी लाट आली असल्याचे अद्याप अधिकृतपणे कोणीही सांगितले नसले तरी वाढते रुग्ण पाहता चौथ्या लाटेचे आक्रमण सुरु झाल्यासारखी परिस्थिती दिसत आहे. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात तर कोरोना रुग्णवाढीचा वेग अधिक  आहे . महाराष्ट्राच्या विविध भागात कोरोना वाढताना दिसत असतानाच पंढरीची आषाढी यात्रा सुरु झाली आहे. यावर्षी यात्रेवर कसलेच बंधन नसून निर्बंधही लागू केलेले नाहीत त्यामुळे स्थानिक पातळीवर अधिक चिंता व्यक्त होऊ लागली आहे. राज्याच्या विविध भागातून भाविक पंढरीत येत असतात शिवाय पंढरपूर तालुक्यात देखील कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत. सद्या सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण पंढरपूर तालुक्यात आहेत. 


कोरोनाच्या यापूर्वीच्या लाटांत देखील पंढरपूर तालुक्यात कोरोनाचे प्रभावी आक्रमण झाले होते आणि बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक होती शिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही जिल्ह्यात सर्वाधिक पंढरपूर तालुक्यातच आढळून आली आहे. पंढरीत यात्रेव्यतिरिक्त देखील राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक रोज येत असतात त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढतो. जिल्हा ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंखेत वाढ होत आहे . सध्या ८४ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत . या ८४ रुग्णात ४३ पुरुष तर ४१ महिलांचा समावेश आहे . आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत भाविकाची गर्दी वाढू लागली असून मास्कचा वापर केला जात नसल्याचे जागोजागी दिसून येत आहे.


कालच्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १२८ चाचण्यात ११ रुग्ण बाधित आढळले आहेत. ११७ अहवाल निगेटिव्ह तर ११ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले . पंढरपूर , माढा , माळशिरस या तालुक्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण संख्या आहे .  अक्कलकोट -०१ , बार्शी -- ० ९ , माढा- ११ , माळशिरस - १० , मंगळवेढा - ०५ , मोहोळ - ०२ , उत्तर सोलापूर - ०१ , पंढरपूर - ३९ , सांगोला - ०४ , दक्षिण सोलापूर -०२ अशी सक्रिय रुग्णांची संख्या असून करमाळा तालुक्यात मात्र एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. (Corona is growing in Solapur district) अशा परिस्थितीतच आषाढी यात्रेस प्रारंभ झाला असून नागरिकांनी आणि भाविकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 


सोलापूर शहरातही प्रभाव

सोलापूर शहरात सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर पोहोचली होती परंतु आता मोठी वाढ होताना दिसत आहे.  शहराच्या विविध भागातून कोरोना रुग्ण आढळू लागले असून रुग्णालयात देखील गर्दी दिसू लागली आहे. गेल्या सहा महिन्यात सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता पण आता मुरारजी पेठ परिसरातील एका ४२ वर्षिय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरात सद्या १३८ सक्रीय रुग्ण असून ४६ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.  


राज्यात वेगाने वाढ !

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना वाढत असून सक्रीय रुग्णांची संख्या २० हजार ८२० वर पोहोचली आहे त्यातील मुंबईत ६ हजार ४०९, पुण्यातील ५ हजार ३३५, ठाण्यात ४ हजार ३७ सक्रीय रुग्णांचा समावेश आहे. देशात सद्या १ लाख १५ हजार २०१२ सक्रीय रुग्ण आहेत. मोठ्या शहरातील वाढ ही अत्यंत वेगाने दिसून येत असून चिंतेची बाब मानली जात आहे. 


  • अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !