BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जुलै, २०२२

एटीएम मशीन फोडण्याचा सलग तिसरा प्रयत्न !


मोहोळ : दोन वेळा प्रयत्न फसल्यानंतर देखील तिसऱ्यांदा एटीम मशीन फोडण्याचा प्रयत्न मोहोळ तालुक्यात झाला असून पोलिसांपुढे हे एक आव्हानच निर्माण झाले आहे. 


अलीकडच्या काळात एटीम मशीन फोडण्याचे प्रकार सगळीकडेच वाढीला लागलेले असून कुठे ब्लास्ट करून मशीन फोडले जाते तर कुठे अख्खी मशीनचा पळवून नेण्याचा प्रकार होतो.  रस्त्यावर अडवून तसेच फसवणूक करून लुटण्यापासून घरफोडी आणि बँकेत घुसून चोरी असे प्रकार घडताना पाहून या चोरांचे मनोधैर्य किती वाढले आहे हेच दिसून येते. मोहोळ तालुक्यात तर बँकेचे एटीम मशीन फोडण्याचे दोन प्रयत्न फसले तरी देखील तिसरा प्रयत्न या अज्ञात चोरट्यांनी केला असल्याचे समोर आले आहे.  मोहोळ शहरातील कुरुल रस्त्यावर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीम मशीन फोडण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्न झाला असल्याची बाब समोर आली आहे. काल रात्री एटीम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला, हेच मशीन फोडण्याचा प्रयत्न आधीही झाला होता. 


मोहोळ शहरात कुरुल रस्त्यावर गजबजलेल्या परिसरात आणि भर चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक एटीम मशीन आहे. याच चौकात बँकेची शाखा असून तेथेच एटीम मशीन असून ग्राहक येथून सेवा घेत असतात. या ठिकाणी दोन मशीन असून एकातून रक्कम काढता येते तर दुसर्या मशीनमध्ये रक्कम भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. रक्कम काढण्याच्या मशीनची देखभाल स्टेट बँकेच्या सोलापूर  मुख्य शाखेकडून करण्यात येते तर रक्कम भरण्याची व्यवस्था असलेल्या मशीनची देखभाल मोहोळ स्टेट बँक शाखेकडून करण्यात येत असते. काल शुक्रवारी रात्री बँकेचे व्यवस्थापक रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बँक बंद करून घरी निघून गेले. आज शनिवारी सकाळी मुख्य व्यवस्थापक उत्तमराव गावडे यांनी सेवा व्यवस्थापक गाडे यांना फोन केला आणि बँकेचे एटीम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती दिली.   


स्टेट बँकेच्या पैसे भरण्याच्या एटीम मशीनची दगडाने तोडफोड करून आतील रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न झाला असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी एटीम मशिनच्या शेजारीच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करण्यात आली असल्याचे दिसून आले. मशीन दगडाच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट दिसत होते. या मशिनमधून नेमकी किती रक्कम चोरीला गेली याची नेमकी माहिती लगेच समजू शकली नव्हती. सेवा व्यवस्थापक सुनील गाडे यांनी या घटनेबाबत मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


तिसरा प्रयत्न !

मोहोळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे सदर एटीएम फोडण्याचा सलग तिसरा प्रयत्न झाला आहे त्यामुळे मोहोळ पोलिसांच्या समोर हे एक आव्हान उभे राहिले आहे. (Third consecutive attempt to break ATM machine) एकाच एटीएम मशीनला पुनः पुन्हा फोडण्याचा प्रयत्न केल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले असल्याचेच दिसत आहे.  


पाच दिवसांपूर्वीच प्रयत्न 

याच बँकेच्या सदर एटीममध्ये पाच दिवसांपूर्वी काही चोरटे घुसले होते पण याची चाहूल एटीएम शाखेच्या नियंत्रण कक्षाला लागली होती. तातडीने पोलिसांना माहिती देताच पोलीस तेथे धावले पण पोलिसांच्या गाड्यांची चाहूल लागताच दोन दुचाकीवर चार चोरटे तेथून पसार झाले होते. पोलिसांच्या जलद हालचालीमुळे मशीनमधील मोठी रक्कम वाचली होती. चेहऱ्यावर कापड बांधून आलेल्या या चोरटयांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारण्याचा प्रयत्न केला होता. याच वेळी सेन्सरमुळे बँकेच्या एटीएम विभागाच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळाली होती. त्यामुळे जलद हालचाली झाल्या होत्या. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !